पिंपरी-चिंचवड : सर्वांना सोबत घेऊन काम करण्यासाठी सभागृहात गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत निलंबन केलेल्या राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचे निलंबन मागे घेतल्याची माहिती महापौर नितीन काळजे यांनी दिली. विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम, नगरसेवक दत्ता साने व मयूर कलाटे यांचे निलंबन अखेर मागे घेण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या गुरुवारी (दि. 20) रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत 31 मार्च 2017 पर्यंतच्या सर्व अवैध बांधकामांना 100 टक्के शास्तीकर माफ करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौरांपुढे धाव घेत सभेचे कामकाज रोखून धरले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या महापौरांनी विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम यांच्यासह राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचे तीन सर्वसाधारण सभांसाठी निलंबन केले होते.
विषयावर पडदा पडणार
शहराचा विकास करत असताना सर्वांना बरोबर घेऊन जायचे आहे. तसेच त्या नगरसेवकांनी निलंबन मागे घेण्याची विनंती केली होती. त्यामुळे निलंबन मागे घेतले असल्याचे, महापौर नितीन काळजे यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचे निलंबन झाल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली होती. भाजपविरोधात भूमिका घेत, राष्ट्रवादी, शिवसेना व इतर पक्षांनी एकत्र येऊन याविषयी महापालिकेत रान पेटवले होते. मात्र, आता चारही नगरसेवकांचे निलंबन मागे घेतल्याने या विषयावर पडदा पडण्याची चिन्हे दिसत आहेत.