राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचा पती मंचरकरचा गोळीबार प्रकरणात हात?

0

एचए कंपनी वसाहतीत शनिवारी महिलेवर झाडल्या होत्या गोळ्या
मंचरकर आणि अन्य दोघांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड : हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनी वसाहतीमध्ये एका महिलेवर झालेल्या गोळीबार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका गीता मंचरकर यांचे पती अ‍ॅड. सुशील मंचरकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेने मंचरकर विरोधात यापूर्वी दिलेली तक्रार परत घेण्यासाठी महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगण्यात आले आहे. मंचरकर याच्यावर महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम यांच्या हत्येचा कट आणि मोक्का अंतर्गत कारवाई सुरु आहे. जेलमधून सराईत आरोपींना पोलीस संरक्षणातून पळून जाण्यासाठी मदत केल्याप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

तक्रार मागे घेण्यासाठी प्रकार
शितल फिलिप सिकंदर (वय 35, रा. गांधीनगर, पिंपरी) असे गोळीबार झालेल्या फिर्यादी महिलेचे नाव आहे. एच ए वसाहतीच्या आवारात शीतल मुलगा दहावी पास झाला म्हणून पेढे घेण्यासाठी आल्या होत्या, त्यावेळी त्यांच्यावर अज्ञात दोघांनी गोळीबार केला. या घटनेत त्या बचावल्या. मात्र आपल्यावर गोळी झाडली गेली असल्याने त्या घाबरल्या आणि बेशुद्ध झाल्या. त्यानंतर शीतल शुद्धीवर आल्यावर पिंपरी पोलिसांनी त्यांची फिर्याद घेतली. त्यावेळी त्यांनी हा खुलासा केला. 2014 साली शीतल यांनी मंचरकर विरोधात एक तक्रार दिली होती. ती तक्रार मागे घेण्यासाठी मंचरकर याने त्याच्या दोन साथीदारांच्या साहाय्याने शीतल यांच्यावर गोळीबार केला. त्यानुसार पिंपरी पोलीस ठाण्यात सुशील मंचरकर आणि अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा झाला गोळीबार
शुक्रवारी (दि. 8) इयत्ता दहावीचा निकाल लागला. शीतल यांच्या मुलाने दहावीची परीक्षा दिली होती. त्या परीक्षेत मुलगा चांगल्या गुणांनी पास झाला. शुक्रवार पासून मुलाच्या यशाचे कौतुक घरभर सुरु होते. एच ए स्कूल जवळ असलेल्या नाशिककर यांच्या दुकानात नाशिकचे प्रसिद्ध पेढे मिळतात. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने नाशिककर यांच्या दुकानात पेढे घेण्यासठी येतात. आज शीतल त्यांच्या एका महिला मैत्रीणीसोबत दुपारी साडेबाराच्या सुमारास एच ए कंपनी वसाहतीमध्ये पेढे घेण्यासाठी आल्या. पावणेएकच्या सुमारास पेढे घेऊन पायी जात असताना पल्सर दुचाकीवरून दोघेजण आले. त्यांनी तोंडाला रुमाल बांधले होते. त्यातील एकाने शीतल यांच्यासोबत असलेल्या महिलेला बाजूला करून शीतल यांच्यावर पिस्टलमधून गोळी झाडली. पहिली गोळी शीतल यांना लागली नाही. त्यामुळे आरोपीने पुन्हा एक गोळी झाडली. सुदैवाने दुसरी गोळी देखील लागली नाही. दरम्यान, शीतल यांनी मोठ्याने आरडाओरडा केला. पकडले जाण्याची शक्यता लक्षात येताच दोन्ही आरोपींनी पल्सर मोटारसायकल वरून धूम ठोकली.