‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांनी स्वतःला आवरावे

0

सभागृह नेते एकनाथ पवार यांचा सल्ला

पिंपरी-चिंचवड : भाजप शहरातील सर्वसामान्य नागरिकांना मुबलक पाणी मिळावे. यासाठी प्रयत्न करीत आहे. निवडणुकीत दिलेल्या प्रत्येक आश्‍वासनाची आम्ही निश्‍चितपणे पूर्तता करणार आहोत. वीस वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस महापालिका सत्तेत असताना पाण्यासारखी गंभीर समस्या ते सोडवू शकले नाहीत. सत्ता गेल्यानं हेच राष्ट्रवादीचे नेते काहीही बरळू लागले असून एका वर्षात प्रश्‍न मार्गी लावा, असा कांगावा करत आहे. त्यामुळे सत्ता नसल्याने जळफळाट झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वतःला आवरावे, असा सल्ला सभागृह नेते एकनाथ पवार यांनी प्रसिध्दीपत्रकातून राष्ट्रवादीला दिला आहे.

पराभवाच्या गर्तेतून बाहेर कधी पडणार?
महापालिकेत मंगळवारी (दि. 20) राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्याला पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यासाठीच्या पत्रकात म्हटले आहे की, पाणीपुरवठा लाभकरात दुप्पट वाढ करण्याच्या मुद्द्यावर शहरातील नागरिकांना भडकविण्याचे काम राष्ट्रवादी करत आहे. 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा भाजपने पराभव केला. या पराभवाच्या गर्तेतून बाहेर न आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे पदाधिकारी भाजपावर सातत्याने बिनबुडाचे आरोप करीत आहे. राष्ट्रवादीला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

पाणीपट्टीचे भांडवल करून दिशाभूल
पाणीपट्टीवाढी संदर्भात स्थायी समितीने प्रस्तावास मंजुरी दिली आहे. परंतु, पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा ठराव मंजूर केलेला नाही. पिंपरी-चिंचवड शहरात पाण्याची समस्या बिकट आहे. हे सर्वसामान्य नागरिकांना माहित आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते याचे भांडवल करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत आहेत. सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करून महानगरपालिकेत याच लोकांनी भ्रष्टाचार व चुकीचा कारभार केला आहे, असे पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.