राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवक पुत्राची हत्या; भाजप कार्यकर्त्यांवर संशय

0

सोलापूर : वाहनाला किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात राष्ट्रवादीच्या एका माजी नगरसेवकाच्या तरुण मुलाचा दहा-बारा जणांच्या जमावाने सशस्त्र हल्ला करून खून केल्याची घटना रात्री घडली. संशयित हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली असून त्यापैकी काही जण भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत याचे समर्थक असल्याचे सांगण्यात येत आहे. बार्शीत राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल व त्यांचे प्रतिस्पर्धी राजेंद्र राऊत यांच्या गटात नेहमीच वाद होत असतो.

बार्शी शहरात उपळाई रस्त्यावर सोलापूर जनता सहकारी बँकेच्या शाखेच्या समोर रात्री आठच्या सुमारास अंकुल ऊर्फ गोलू श्रीधर चव्हाण हा आपल्या दोन वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन आपल्या वाहनाजवळ थांबला होता. त्या वेळी अचानकपणे मोटारसायकली घेऊन दहा-बारा जणांच्या जमावाने तेथे येऊन दहशत निर्माण केली व नंतर अंकुल चव्हाण याच्यावर तलवारी, कोयता, लोखंडी गज, लाकडी दांडके व दगडाने जोरदार हल्ला केला.