अतिक्रमण विभागाची कारवाई
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनासाठी शहरात सगळीकडे फ्लेक्स, होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. मात्र, पिंपळे सौदागर येथे काही अनधिकृत फलक असल्याने ते महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मंगळवारी पिंपळे सौदागरमधील काही फ्लेक्सवर कारवाई करून काढून टाकण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सरकार विरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये सलग दोन दिवस हल्लाबोल आंदोलन केले जात आहे. मंगळवारी सायंकाळी भोसरीत, तर बुधवारी सायंकाळी काळेवाडीत हे आंदोलन होत आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकार्यांनी जनजागृतीसाठी शहरभर आंदोलनाचे फ्लेक्स, होर्डिंग्ज लावले आहेत.
दरम्यान, सोमवारी पिंपळे सौदागरमधील काही फ्लेक्स महापालिकेच्यावतीने कारवाई करून काढून टाकण्यात आले होते. महापालिका प्रशासनाने केलेली ही कारवाई राजकीयदृष्ट्या प्रेरित असून सत्ताधारी भाजपच्या मंडळींकडून जाणीपूर्वक कारवाई करण्यास भाग पाडले जात असल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या वर्तुळात सुरू आहे.