राष्ट्रवादीतर्फे जिल्हाभरात हल्लाबोल आंदोलन

0

जळगाव । शेतकरी, विद्यार्थी, नोकरदारवर्ग आदी सर्वांचेच विविध प्रश्‍नांबाबत सरकार सकारात्मक भूमिका घेत नसून विद्यमान सरकार सर्वच आघाडीत अपयशी ठरली आहे. कर्जमाफी जाहीर होवून पाच महिने उलटले मात्र अद्यापही घोळ दूर होत नसून शेतकर्‍यांना प्रत्यक्ष कर्जमाफी झालेली नाही. सरकारकडून सामान्य जनतेवर अन्याय होत असून याचा निषेधार्थ 25 ते 30 नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे जिल्ह्याभरात हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ.सतिश पाटील यांनी दिली. हल्लाबोल आंदोलनाच्या नियोजनासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस कार्यालयात जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार दिलीप वाघ, राजीव देशमूख, अरुण पाटील, विकास पाटील, विलास पवार आदींसह जिल्ह्याभरातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

पायी दिंडी
यावेळी तहसिलदार, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. दरम्यान 28 रोजी माजी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. नागपूर अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर 1 ते 11 डिसेंबर दरम्यान यवतमाळ येथून नागपूर विधीमंडळ अधिवेशनावर पायी दिंडी काढण्यात येणार आहे. पायी दिंडीत खासदार सुप्रिया सुळे शेवटपर्यत सहभागी राहणार आहे.

पक्ष हॉकर्सच्या पाठीशी
महानगरपालिकेतर्फे अतिक्रमण मोहिम राबविण्यात येत असून हॉकर्स बांधवांच्या लोटगाडी, टपर्‍या तोडण्यात येत आहे. अतिक्रमण काढावे मात्र हॉकर्सच्या मालमत्तेचे नुकसान करु नये मनपातर्फे हिटलरशाही पध्दतीने हॉकर्सवर अन्याय होत असून हॉकर्सच्या पाठीशी राष्ट्रवादी कॉग्रेसपक्ष आहे. हॉकर्सच्या न्याय हक्कासाठी पक्ष रस्त्यावर उतरणार याबाबत महानगरपालिका कार्यकारीणीला सुचना देण्यात आलेल्या असल्याचे आमदार सतिश पाटील यांनी सांगितले.