धुळे । राज्यातील भाजप सरकारला तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र या तीन वर्षांत सरकारने फक्त घोषणा आणि आश्वासने देत जनतेला विकासाचे गाजर दाखविले आहे. त्याचाच निषेध करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गाजर दाखवा आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचे मुखवटे लावत समोर गाजर ठेवल्याने तसेच गाजर सरकारची तीन वर्षे असा मोठा फलक लावण्यात आले होते. हा फलक सर्वाचा लक्ष वेधून घेत होता. राज्यातील भाजप सरकारने काळा पैसा, अच्छे दिन असे शब्द वापरून तसेच शिवस्मारक, रोजगार निर्मिती, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये, धनगर-मराठा आरक्षण, शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी, महिला सुरक्षा योजना आदींसह महागाई कमी करणार, दहशतवाद रोखणार असे वारंवार बोलून जनतेची दिशाभूल केली आहे. पेट्रोल-डिझेलसह स्वयंपाकाचा गॅस महाग करुन सरकारने गोर-गरीबांना जीवन जगणे कठीण केले आहे.
त्यातच जीएसटी कर लावून शासनाने आर्थिक लूट सुरु केल्याने उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहे. परिणामी बेरोजगारी वाढली आहे. महिला अत्याचार, शासकीय कर्मचार्यांची वेतन वाढ हे प्रश्न देखील आहेत. या सर्वांचाच जाहीर निषेध करण्यासाठी व या गाजर सरकारला जाग यावी म्हणून आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले, प्रदेश सरचिटणीस सत्यजित सिसोदे, शहराध्यक्ष कुणाल पवार यांच्या नेतृत्वात गाजर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महेंद्र शिरसाठ, कमलाकर गर्दे, उदयनराजे जाधव, मयुर ठाकरे, सचिन आखाडे, संदिप पाकळे, भटू पाटील, विनोद बच्छाव, सागर पाटील, कृष्णा गवळी, बंटी भदाणे, भैय्या शिंदे, मयुर पवार, आकाश पाटील, सोनल शर्मा, हरिष शेलार, मंदार पाटील, एजाज शेख, बंटी पवार, प्रफुल्ल पवार, राज कोळी आदी सहभागी झाले होते.