धुळे । गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा निषेध करीत राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला अघाडीने मंगळवारी 6 रोजी सिलेंडरची अंत्ययात्रा काढली. महिलांनी यावेळी प्रशासनाला शेणाच्या गौर्या भेट दिल्या. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे अनुदान संपुष्टात आणून दरवाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकाने घेतला आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नुकतेच याची माहिती दिली आहे. यापुर्वी केंद्राने अनुदानित सिलेंडरच्या किंमतीत महिन्याकाठी दोन रुपयांनी वाढ करण्याच्या सुचना केल्या होत्या. आता घरगुती अनुदानातीत सिलिंडर दरामध्ये दुप्पटीने वाढ करण्यात येत आहे. त्यामुळे गॅस सिलेंडर 83 ते 84 रुपयांन महागले आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हा प्रशासनाला प्रतिकात्मक स्वरुपात गौर्यांची भेट देण्यात आली. यावेळी महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ.ज्योती पावरा यांच्यासह डॉ.सुवर्णा शिंदे, इंदुताई वाघ, मीनल पाटील, प्रियंका पाटील, सुमित्रा चौधरी, राधिका ठाकूर, सरिता दोरिक, स्वेता पाटील, आरती पवार, राजश्री शिंदे, कल्पना गवळी, वंदना पाटील, बक्षी मॅडम, फातीमा शेख, सुवर्णा बेहरे आदी उपस्थित होते.
सरकारचा दुटप्पीपणा
एकीकडे उज्वला योजनेतंर्गत मोफत गॅस जोडणी देऊन गरीबमहिलांना मदत करीत असल्याचे नाटक करायचे, अच्छे दिनचे स्वप्न दाखवून देशातील गोर गरीब जनतेचा विश्वासघात करायचा आणि दुसरीकडे जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतीत बेसुमार वाद करायची असा दुटप्पीपणा केंद्र सरकार करीत असल्याचा आरोप करीत आज राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या पदाधिकारी महिला कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यत गॅस सिलेंडरची अंतयात्रा काढून निदर्शने केली.