राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले चोर पालिका लुटताहेत : उबाळे

0

भोसरी रुग्णालयाचा खासगीकरणाचा प्रस्ताव विखंडीत करा
पिंपरी-चिंचवड : सत्तेसाठी हापलेली राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेली चोर मंडळी पिंपरी-चिंचवड महापालिका चाटून-पुसून खात आहेत. त्यामध्ये आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा देखील सहभाग आहे. नगरसेवकच ठेकेदार किंवा ठेकेदारांचे भागीदार बनून महापालिका लुटत असल्याचा आरोप शिवसेनेच्या शिरुर जिल्हा महिला संघटीका सुलभा उबाळे यांनी केला. तसेच भोसरीतील महापालिका रुग्णालयाचा खासगीकरणाचा प्रस्ताव विखंडीत करण्याची मागणीही त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. त्यात उबाळे यांनी म्हटले आहे की, मोठ्या आशा अपेक्षा ठेऊन आणि आपल्या ’ना भय, ना भ्रष्टाचार’ या घोषणेला भुलून पिंपरी-चिंचवडकरांनी महापालिकेत भाजपला एकहाती सत्ता दिली. भाजपच्या 78 नगरसेवकांना जनतेने निवडून दिले. सत्तेची लालची राष्ट्रवादी काँग्रेसचे 90 टक्के नगरसेवक भाजपच्या चिन्हावर निवडून आले. त्यांनी महापालिकेत भ्रष्टाचार करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन वर्षाच्या काळात वाढीव दराच्या निविदेविना एकही स्थायी समितीची सभा झालेली नाही. नगरसेवकच ठेकेदार किंवा ठेकेदारांचे भागीदार बनून महापालिका लुटत आहेत.

रुग्णालय खासगी संस्थेस का?
त्याचाच एक भाग म्हणजे महापालिकेचे भोसरीतील प्रशस्त रुग्णालय खासगी संस्थेस चालविण्यास देण्याचा घाट घातला आहे. याबाबतचा प्रस्ताव महासभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. यामध्ये जनतेची सोय-सेवा हा विषयच नाही. तर, स्वत:चा स्वार्थ लपलेला आहे. त्यामुळे आपण स्वत: लक्ष घालून महापालिकेचे रुग्णालय खासगी संस्थेस चालविण्यास देण्याचा ठराव विखंडीत करावा, अशी मागणी उबाळे यांनी निवेदनातून केली आहे.