राष्ट्रवादीत जाण्याचा विचार नाही

0

भुसावळ । भाजपाचे संघटन वाढविण्यासाठी मी संपुर्ण आयुष्य पणाला लावले, कार्यकर्ते घडविले त्यामुळे पक्ष सोडून राष्ट्रवादीत जाण्याचा माझा कुठलाही विचार नाही, कुणालातरी मी हवाहवासा वाटतो त्यामुळे माझ्यावर प्रेम असणारे काही जण अशा अफवा पसरविण्याचे काम करीत आहे. यात मात्र कुठलेही तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण आमदार एकनाथराव खडसे यांनी दिले. भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रा. सुनिल नेवे यांच्या निवासस्थानी आमदार खडसे यांनी सोमवार 27 रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास धावती भेट दिली. यावेळी त्यांनी भोजन आटोपून पत्रकारांशी वार्तालाप करताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याबद्दल सुरु असलेल्या चर्चावर खुलासा करुन या प्रकरणावर पडदा टाकला.

गेल्या दोन दिवसांपासून आ. खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात ‘व्हायरल’ होत आहे. या पार्श्‍वभूमिवर स्वत: खडसे यांनी आज या प्रकरणी हा सर्व खोडसाळपणाचा प्रकार असल्याचे ठासून सांगत आपली भूमिका स्पष्ट केली. याप्रसंगी आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, गटनेता हाजी मुन्ना तेली, नगरसेवक प्रा. सुनिल नेवे, मनोज बियाणी, चंद्रशेखर अत्तरदे, अ‍ॅड. बोधराज चौधरी, शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, पिंटू ठाकूर, पिंटू कोठारी, प्रमोद सावकारे, पंचायत समिती सभापती सुनिल महाजन, उपसभापती मनिषा पाटील, मुकेश पाटील आदी उपस्थित होते.

अफवांकडे लक्ष देत नाही

यावेळी आमदार खडसे म्हणाले की, काही पक्षात व पक्षाबाहेर माझे प्रेमी आहेत. तेच अशा अफवा पसरवित असतात. राष्ट्रवादी काँग्रेस डुबती नैय्या असून अशा बुडत्या जहाजात बसायला कोण जाणार? आजपर्यंत मी भाजपाशी एकनिष्ठ राहून काम केाले आहे. जळगाव जिल्ह अगोदर खडकाळ होता. मात्र त्याला आता सुपिक बनविले आहे. यात पिकासोबत तणही वाढत आहे. त्यामुळे अशा अफवांकडे मी लक्ष देत नाही, सोशल मिडीयावर नवाब मलिकांसोबत माझे छायाचित्र टाकले जात असून ते जुने असल्याचा खुलासा देखील आमदार खडसे यांनी यावेळी केला