भुसावळ (गणेश वाघ) : भाजपाकडून गेल्या चार वर्षांपासून सापत्नभावाची वागणूक मिळत असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे घटस्थापनेच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीत प्रवेश करीत असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत व तसे झाल्यास राज्यात राष्ट्रवादीची ओबीसी ताकद वाढेल यात शंकाच नाही शिवाय एकगठ्ठा मतदान असलेला लेवा पाटीदार समाजदेखील राष्ट्रवादीच्या पाठीशी असेल व खडसेंचा प्रभाव असलेल्या क्षेत्रातील नगरपालिका, नगरपरीषद, पंचायत समिती व जिल्हा परीषद, जिल्हा बँक, दुध संघ राष्ट्रवादीच्या ताब्यात जावून राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे. खडसेंनी त्यादृष्टीने चाचपणी सुरू केली असून कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी वाढल्या आहेत. असे असलेतरी खडसेंना विधानपरीषद आमदार केल्यानंतर खडसेंची स्वप्नपूर्ती होणार की नाही? हा खरा प्रश्न आहे.
खडसेंनी करून दाखवले
1980 च्या दशकात भाजपाचा एकही जिल्हा परीषद, पंचायत समिती सदस्य नसताना खडसेंनी डॉ.गुणवंतराव सरोदे, स्व.फडके यांच्या खांद्याला खांदा लावून पक्ष वाढवला, सत्ता काबीज केली. विशेषतः स्थानिक स्तरावरील देखरेख संघ ते दुध संघ जिल्ह्यात ताब्यात ठेवण्यात ते यशस्वी झाले वर्चस्वही त्यांनी कायम राखले. सतत 40 वर्ष राज्याच्या राजकारणावर पकड असलेल्या लोकनेत्याला मात्र आपल्याच पक्षाने हळूहळू दूर लोटले व आरोपातून क्लीनचीट मिळाल्यानंतरही खडसेंना पक्षाने जवळ घेतले नाही व त्यामुळे खडसेंसह समर्थक कमालीचे व्यथीत असल्याने त्यांनी पक्षांतराचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
खडसेंचा प्रभाव कमी झाल्याचे फिडींग !
विविध आरोपांमुळे मंत्री पदापासून पाय-उतार झालेल्या एकनाथराव खडसेंचा राजकारणातील प्रभाव कमी झाल्याचे फिडींग आप्तस्वकीयांनी त्याकाळात पक्ष श्रेष्ठींकडे केले शिवाय खडसे भाजपा सोडून गेल्यानंतर काय चित्र असेल याबाबतही घेण्यात आलेल्या आढाव्यात चुकीचे फिडींग करण्यात आल्यानंतर खडसेंना तिष्ठत ठेवण्यात आले. विधानसभा निवडणुकीत खडसेंना तिकीट नाकारण्यात आले व त्यांची कन्या अॅड.रोहिणी खडसे या निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक नसतानाही त्यांना तिकीट देण्यात आले व निवडणुकीत त्या पराभूत झाल्या. खडसेंचे पुर्नवसन करणार, खडसेंना राज्यपालपदी नियुक्त करणार, असे सोयीस्कर आश्वासन देवून वेळ मारून देण्यात आली मात्र पाठीमागून आलेल्यांना मंत्री पदे व क्लीन चीट देण्यात आली असताना खडसेंना मात्र जाणीवपूर्वक लांबच ठेवण्यात आले. केंद्रीय कार्यकारीणीतही खडसेंना स्थान न देण्यात आल्याने व पक्ष आपल्याला दूर लोटत असल्याचे स्पष्ट झाल्याने कदाचीत खडसेंनी राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय घेतला असावा? असे राजकीय समीक्षकांना वाटते.
खडसेंची स्वप्नपूर्ती होणार का?
गेल्या 40 वर्षांपासून राजकारणात सक्रिय असलेल्या खडसेंनी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहिले व त्यामुळे आपला राजकीय बळी गेला? असा दावा खुद्द खडसेंनी केला असताना आता राष्ट्रवादी प्रवेशानंतर त्यांना विधानपरीषद आमदारकीच्या तिकीटानंतर मंत्री पद मिळणार का व खडसेंना नेमकी काय संघटनात्मक जवाबदारी मिळणार? हेदेखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. विशेष म्हणजे फडणवीस व खडसेंमध्ये ज्या पदावरून सख्य निर्माण झाले ते पद आता खडसेंना राष्ट्रवादीत गेल्यानंतर मिळणार का? हादेखील अनुत्तरीत प्रश्न आहे.
राष्ट्रवादीची मात्र वाढणार ताकद
राज्यात खडसेंना मानणारा मोठा वर्ग असल्याने खडसे राष्ट्रवादीत आल्यास राष्ट्रवादीची खान्देशासह विदर्भातील ताकद वाढेल यात शंकाच नाही. आजघडीला भाजपाकडे जळगाव जिल्हा परीषद, दुध संघ तसेच जिल्ह्यातील अनेक पालिकांवर सत्ता आहे मात्र खडसे राष्ट्रवादीत गेल्यास भविष्यात चित्र वेगळे असेल हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. नगराध्यक्ष, नगरसेवक, पंचायत समिती, जिल्हा परीषद सदस्य तसेच आमदार ही नाथाभाऊंची खान्देशातील ताकद असली तरी हे लोक पक्षांतर बंदी कायद्यामुळे आज लागलीच राष्ट्रवादीत प्रवेश करणार नाहीत हेदेखील तितकेच खरे ! मात्र आगामी निवडणुका लागेपर्यंत ते भाजपात कागदावर असलेतरी मनाने मात्र ते खडसेंसोबत असतील हेदेखील तितकेच खरे ! शक्य झाल्यास पदे असणज्ञक्षय;ज्ञ लोकप्रतिनिधींच्या घरातील पदावर नसलेले लोक खडसेंसोबत राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात, अशी दाट शक्यता आहे.
मुक्ताईनगरात वाढला कार्यकर्त्यांचा राबता
खडसेंचा राजकारणातील विषय संपल्याचे मार्केटींग काहींनी सोयीस्कर केले मात्र संयमी खडसेंनी ही बाब मनावर न घेता दुर्लक्ष करीत पक्षाचे प्रामाणिकपणे काम सुरू ठेवले व अलीकडच्या काळात त्यांनी आपले एक-एक पत्ते उघडण्यास सुुरूवात केली आहे. माजी आमदार उदेसिंग पाडवी (तळोदा) यांनी राष्ट्रवादीत केलेला प्रवेश नाथाभाऊंच्या सांगण्यावरूनच केला, अशी माहिती स्वतः खडसे यांनी माध्यमांना दिली तर एका वाहिनीशी बोलताना पाडवी यांनी खडसे हे राष्ट्रवादीत जाणार असल्याचे सांगत त्यांना मानाचे पद मिळणार असल्याचा दावा केला आहे दुसरीकडे मुक्ताईनगरातील खडसेंच्या फार्म हाऊसवर कार्यकर्त्यांसह पदाधिकार्यांचा राबता वाढला आहे. धुळे, नंदुरबार, अक्कलकुवा, शिरपूर, विदर्भ भागातील प्रमुख पदाधिकारी खडसेंच्या भेटी घेत आहेत त्यामुळे आगामी काही दिवसात खडसे आपली ताकद दाखवतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.