पंधरा दिवसांचे भांडवल करुन विरोधकांचे राजकारण
पिंपरी चिंचवड : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात शास्तीकर अंमलबजावणी झाली. पिंपरी चिंचवडकरांवर शास्तीकर लादण्याचे पाप राष्ट्रवादीने केले. त्याचे पाप धुवून काढायचे काम भाजप सरकार करत आहे. विरोधक पंधरा दिवसांचे भांडवल करुन राजकारण करीत असल्याचा पलटवार सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केला. तसेच, शास्तीचा प्रश्न सोडविण्यास मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंचवड येथील कार्यक्रमात 15 दिवसात शास्तीकराबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस, सेना, मनसेसह सामाजिक संस्थांनी काऊंट डाऊन आंदोलन सुरू केले आहे. तसेच, 15 दिवसांची मुदत संपल्यानंतर आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. त्यावरून भाजपच्या वतीने पक्षनेते पवार यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे.
हे देखील वाचा
शास्तीकराबाबत मुख्यमंत्री सकारात्मक...
पवार म्हणाले की, आता ‘काऊंट डाऊन’ करणारे विरोधक शास्तीकराच्या प्रश्नावरून यापूर्वी झोपी गेले होते का? सरकारने 600 चौरस फुटांच्या बांधकामांना माफी व 1 हजार चौरस फुटांसाठी 50 टक्के माफी दिली. मात्र, आम्ही सर्वांनी नागरिकांना शास्तीकरापासून आणखी दिलासा देण्याची विनंती केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेण्याबाबत आश्वस्त केले. प्रशासकीय कारभारात वेळेत कामे होत नसतात. मात्र, शास्तीकराबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. दोन-चार दिवस इकडे तिकडे झाले, तरी भाजप नागरिकांना दिलासा देणार आहे. राष्ट्रवादीने शास्तीकरापासून नागरिकांची सुटका करण्यासाठी काय केले, हे सांगावे. त्यांनीच शास्तीकर लादला असून ते पाप धुवून काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही ते म्हणाले.