राष्ट्रवादीला आणखी धक्का; हे आमदार करणार शिवसेनेत प्रवेश !

0

पुसद: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षातील नेते भाजप, शिवसेनेत प्रवेश करत आहेत. दरम्यान राष्ट्रवादीला विदर्भात आणखी एक धक्का बसणार आहे. पुसद विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री मनोहरराव नाईक हे आपल्या दोन्ही मुलांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मनोहरराव नाईक हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची बंधू आहेत.

मनोहरराव नाईक यांचे सुपुत्र इंद्रनील नाईक मंगळवारी मुंबईत शिवसेनेत प्रवेश करतील असे बोलले जात आहेत. मनोहरराव नाईक हे स्वत: शिवसेना प्रवेशाच्या जाहीर कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. मात्र त्यांच्या हातावरही शिवबंधन बांधले जाईल. मनोहरराव नाईक यांच्याऐवजी त्यांचे पुत्र इंद्रनील नाईक हेच आगामी विधानसभा निवडणुकीचा पुसदमधील चेहरा असतील, अशी चर्चा आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत आघाडीसाठी पोषक वातावरण नसतानाही मनोहरराव नाईक पुसद मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे नाईक यांनी शिवसेनेची वाट धरल्याने विदर्भात राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असणार आहे.