राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू ; शिवसेना खासदाराच्या विधानानं खळबळ

परभणी : जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या नियुक्तीवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील वाद समोर आला आहे. गोयल यांच्या नियुक्तीवरून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट संघर्ष पेटला असून शिवसेना खासदार संजय जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गरज पडल्यावर माकडीणही तिच्या पिल्लाला बुडवते. आम्हीही राष्ट्रवादीला बुडवू, असं खळबळजनक विधान शिवसेना खासदार संजय जाधव यांनी केलं आहे. आमचं तेवढं उघडं करतात. आता पाणी वर जाऊ लागले आहे, अशा शब्दांत जाधव यांनी संताप व्यक्त केला.

पदनियुक्तीनंतर घडलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आंचल गोयल यांची जिल्हाधिकारी पदावर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती होऊ नये यासाठी शिवसेना खासदाराने थेट मंत्रायात लॉबिंग केल्याची चर्चा होती. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय जाधव यांनी या नियुक्तीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. “जेव्हा माकडीण सुद्धा स्वतः बुडायची वेळ आली तेव्हा पिल्लांना पायाखाली घालते तर लक्षात ठेवा राष्ट्रवादीला आम्ही कधीही घालू. शेवटी आता खूप सहनशक्तीच्या पलीकडे गेलो. काल फक्त कलेक्टर बदलायचा होता तर मी फक्त मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली होती. पण त्या राष्ट्रवादीवाल्यांनी एवढं रान पेटवलं जसे काही मोठा अपराध केला. आपलं घ्यायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी राष्ट्रवादीवाल्यांची अवस्था आहे. पण तरीही मुख्यमंत्र्यांचा आदेश आम्ही मान्य केला आहे. शेवटी काही मर्यादा असतात कुठं पर्यंत शांत बसायचं आहे कुठं पर्यंत सहन करायचं आहे, असं संजय जाधव यांनी म्हटलं आहे. शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.