कर्जत : 2019 हे वर्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे असेल. शरद पवार हे पंतप्रधान होऊ शकतात, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी वर्तवले आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांचे चिंतन शिबिर सोमवारपासून सुरू झाले आहे. यावेळी पदाधिकार्यांना मार्गदर्शन करताना प्रफुल्ल पटेल यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्या पंतप्रधानपदाचा मुद्दा मांडला. मागील विधानसभा निवडणुकीपासून प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादीची घसरण सुरू असताना पटेल यांनी अशाप्रकारचे भाकीत वर्तविल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू होती.
काँग्रेसबरोबर आघाडीसाठी तयार
पटेल म्हणाले, गेल्या तीन ते चार महिन्यांत देशभरात सरकारविरोधी वातावरण तयार झाले आहे. नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयांमुळे सामान्य जनता आणि व्यावसायिक नाराज आहेत. ज्या गुजरातचा विकास दाखवून मोदी पंतप्रधान झाले, त्या गुजरातमधील शेतकरी आज हवालदिल झाले आहेत. त्यामुळे राज्यात भाजपची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना गल्लोगल्ली सभा घेण्याची वेळ आली आहे. भाजपसाठी हे लज्जास्पद आहे. याउलट देशाच्या राजकारणात शरद पवार यांच्या शब्दाला वजन असल्यामुळे सर्वत्र त्यांचा दबदबा आहे. त्यामुळे पंतप्रधानही सभागृहात शरद पवार यांना मान देतात, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. गुजरातच्या निवडणुकीत आम्ही काँग्रेसबरोबर युती करायला तयार आहोत. वेगळे लढण्यात दोन्ही पक्षांचे नुकसान असल्याचे मत पटेल यांनी व्यक्त केले.