पिंपरी-चिंचवड : महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना भाजपने राष्ट्रवादीवर विविध भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. आता शद्बाला कृतीची जोड देऊन राष्ट्रवादीवर आरोप केलेल्या भ्रष्टाचारांच्या प्रकरणाचा भाजपने सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे. यासंदर्भात भापकर यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. महापालिका निवडणुकीत भाजपने ‘ना भय, ना भ्रष्टाचार; पारदर्शक कारभार’ असे वाक्य वापरून प्रचार केला. त्याला नागरिकांनीही भरघोस प्रतिसाद दिला. 77 नगरसेवक निवडून देऊन भाजपला एकहाती सत्ता दिली. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ न देता भाजपने राष्ट्रवादीवर केलेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांचा सोक्षमोक्ष लावावा, असे भापकर यांनी म्हटले आहे.
भ्रष्टाचाराची साखळी उद्ध्वस्त करा
नगरसेवक, ठेकेदार, अधिकारी, सल्लागार यांची साखळी उद्ध्वस्त करून भ्रष्टाचाराला प्रतिबंध करावा. टीडीआर धोरण, बीओटी, पीपीपी धोरण यातून चालणारी टक्केवारी थांबवावी लागेल. स्थायी समितीच्या सभागृहातील मासळी बाजार रोखणे गरजेचे आहे. वाढीव खर्चाला फाटा देण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे. ‘ना खाऊँगा, ना खाने दूंगा’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्राचा जप भाजपच्या पदाधिकार्यांनी करण्याचा सल्लाही भापकर यांनी दिला आहे.