राष्ट्रवादी आणि सेना काय करणार?

0

पुणे । लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत शिवसेना भाजपबरोबर आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष काँग्रेससमवेत होता. त्यानंतरच्या साडेतीन वर्षांत राजकारण खूप बदलले आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष येत्या लोकसभेला काय करणार हा प्रश्‍न साहजिकच निर्माण होतो.सन 2014मध्ये भाजप-शिवसेना युती घट्ट होती, देशात मोदी लाट होती. त्यात भाजपला लोकसभेत बहुमत मिळाले. मात्र त्यानंतर युतीचे गाडे बिनसत गेले. भाजपच्या नेत्यांनी शिवसेना नकोच असा पवित्रा घेण्यास सुरुवात केली. शत-प्रतिशत भाजप हा सूर पुन्हा आळविला जाऊ लागला. भाजपची दिशा ओळखून शिवसेना सावध झाली. लोकसभे पाठोपाठ महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या त्यात सेना आणि भाजपने वेगळ्या चुली मांडल्या. पुढे सेना राज्याच्या मंत्रिमंडळात सहभागी झाली; पण पक्ष म्हणून दोघेही एकमेकांपासून दूर राहिले. आता तर सेना भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेणार का? इतकी शंका घ्यावी अशी पावले पडत आहेत.

पुण्यात स्वतंत्र लढल्यावर सेनेला विधानसभेच्या दोन जागा गमवाव्या लागल्या. महापालिकेतही मोठे यश मिळाले नाही. यापुढे शिवसेना लोकसभा जागाही स्वतंत्रपणे लढविणार का? तसे झाल्यास भाजपला फटका बसू शकतो. मतांची विभागणी भाजपला परवडणारी नाही. त्यामुळे दोन्ही पक्ष आता भांडत असले तरी लोकसभेसाठी सवतासुभा ठेवतील का? याचा विचार करावा लागेल. भाजपलाच सेना नको असेल तर प्रश्‍न मिटला.

राष्ट्रवादी हक्क सांगणार
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वेगळा मुद्दा आहे. 2014पासून काँग्रेसची वेगाने घसरण चालू आहे. सध्या या पक्षाचे फक्त 9 नगरसेवक आहेत. त्या तुलनेत राष्ट्रवादीची स्थिती बरी म्हणावी लागेल. या पक्षाचे 38 नगरसेवक आहेत. महापालिकेचे विरोधी पक्षनेते पद या पक्षाकडे आहे. हे गणित पाहिले तर पुण्यातील लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस हक्क सांगण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडे सक्षम उमेदवार तूर्त तरी दिसत नाही. याचाही फायदा राष्ट्रवादी उचलेल. शहरातील सर्व थरात काँग्रेस पोहचली आहे. राष्ट्रवादी मात्र एका मर्यादेत अडकलेली आहे. भाजप एकवेळ शिवसेनेला बाजूला ठेवून लोकसभा दमदारपणे लढू शकेल पण काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांशिवाय लढण्याचा विचारही करू शकत नाहीत.

-राजेंद्र पंढरपुरे