राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘अंडरवर्ल्ड कनेक्शन’

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या ठेकेदारांकडून टक्केवारी घेतली जात असल्याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करणार्‍या प्रमोद साठे याच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. साठे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई झाली आहे. तसेच तो खुनातील आरोपी असून, एका अंडरवर्ल्ड डॉन टोळीतील गुंड असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीच्या दोन माजी महापौरांच्या पुण्यातील कुटुंबासोबत साठेचे ऊठबस आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध उघड झाले आहेत, असा घणाघाती आरोप भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी करून एकच खळबळ उडवून दिली.

खून, खंडणीप्रकरणी अनेकदा अटक
आ. जगताप म्हणाले, प्रमोद पुरूषोत्तम साठे याने ठेकेदारांची बिले देण्यासाठी टक्केवारी मागितली जात असल्याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडे केलेली तक्रारसुद्धा राष्ट्रवादीच्या दबावाचाच एक भाग आहे. प्रमोद साठे ना महापालिकेचा ठेकेदार आहे, ना शहरातील रहिवासी आहे, ना त्याने कोणतेही पुरावे सादर केले आहेत. तरीही त्याने केलेल्या तक्रारीची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने चौकशीचे आदेश दिले. भाजपचा हा पारदर्शक कारभार आहे. प्रमोद साठे हा पुण्यातील भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांचे पती सतीश मिसाळ यांच्या खुनातील आरोपी असून, तो अंडरवर्ल्डमधील एका डॉनच्या टोळीतील गुंड आहे. त्याचप्रमाणे त्याला विश्रामबागवाडा पोलिसांनी बिल्डरांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी अनेकवेळा अटकही केली आहे. तो सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाईदेखील झाली आहे.

दोन माजी महापौरांच्या दुसर्‍या कुटुंबांसोबत उठबस
कोथरूडमधील मयूर कॉलनीतील हॉटेल ओएस्टरशी तो संबंधित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन माजी महापौरांचे पुण्यात असलेल्या दुसर्‍या कुटुंबीयांसोबत त्याची ऊठबस आहे. तसेच खुनाच्या गुन्ह्यात येरवडा जेलची हवा खाऊन आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका माजी स्थायी समिती सभापतीचा जवळचा मित्र आहे. या माजी स्थायी समिती सभापतीला आपल्या प्रभागात मॉडेल वॉर्डच्या नावाखाली केलेल्या कामांची बिले नियमबाह्यपणे मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे त्याच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातून अस्वस्थ झालेल्या स्थायी समितीच्या या माजी सभापतीने आणि राष्ट्रवादीच्या एका विद्यमाने नगरसेवकाने प्रमोद साठे याला पुढे करून पंतप्रधान कार्यालयाकडे खोटी तक्रार करण्यास भाग पाडले आहे, असाही आरोपही आ. जगताप यांनी केला.

सत्तेविना राष्ट्रवादी पिसाळली
राष्ट्रवादी काँग्रेस आणि अंडरवर्ल्डचे संबंध उघड झाले आहेत. महापालिकेत सत्तेत असताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी मनमानेल त्या पद्धतीने कामे करून करदात्यांच्या पैशांची लूट करत होते. मात्र आता त्याला चाप बसल्यामुळे अंडरवर्ल्डमधील संबंधाचा वापर करून महापालिकेत नियमबाह्यपणे कामे करण्यासाठी एकप्रकारे धमकावले जात आहे. त्यामुळे सत्तेविना पिसाळलेली राष्ट्रवादी करदात्यांची लूट करून पैसे कमविण्यासाठी कोणत्या थराला चालली आहे, हे स्पष्ट होत आहे. मात्र भारतीय जनता पक्ष अशा दबावाला आणि खोट्या तक्रारींना कदापिही भीक घालणार नाही. महापालिकेत नियमानेच काम चालेल, असेही आ. जगताप यांनी ठणकावून सांगितले.

ठेकेदारांच्या खांद्यावर राष्ट्रवादीची बंदूक
महापालिकेतील ठेकेदारांना आतापर्यंत नियमबाह्य बिले दिली जात होती. मात्र भाजपने सत्तेत आल्यानंतर यापुढे कायद्यातील तरतुदीनुसारच बिले देण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली. त्याबाबत ठेकेदारांना कोणतीही अडचण नाही. मात्र ठेकेदारांच्या आडून नियमबाह्यपणे पैसे कमविण्याचा धंदा चालविलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांना भाजप नियमाने वागत आहे, हे रूचलेले नाही. राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकार्‍यांच्या नियमबाह्य कामांचे पैसे महापालिकेत अडकल्यामुळे ठेकेदारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून बिले मिळावीत, यासाठी वेगवेगळ्या प्रकारे दबाव टाकण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे, असेही आ. जगताप म्हणाले. यावेळी महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती सीमा साळवे, नगरसेविका आशा शेंडगेे, नगरसेवक हर्षल ढोरे, नामदेव ढाके, शीतल शिंदे, भाजप सरचिटणीस सारंग कामतेकर, प्रमोद निसळ आदी उपस्थित होते.