राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना महात्मा फुले समता पुरस्कार

0

पुणे : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना महात्मा फुले समता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मानपत्र, एक लाख रुपये, मानचिन्ह, फुले पगडी असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले यांच्या १२८ व्या स्मृतीदिनानिमित्त बुधवारी २८ नोव्हेंबर रोजी ‘समता दिन’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. समता भूमी, महात्मा फुले राष्ट्रीय स्मारक, महात्मा फुले पेठ, पुणे येथे सकाळी ९.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो फुले-शाहू- आंबेडकर अनुयायी उपस्थित राहणार आहेत. तसेच पुणे जिल्ह्यीतील विविध ठिकाणांहून येणाऱ्या समता ज्योतीचे स्वागत महात्मा फुले वाडा येथे केले जाणार आहे. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांनी केले आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मानवसंसाधन राज्यमंत्री उपेंद्र कुशवाहा, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.

यापूर्वी हा पुरस्कार प्रा. हरि नरके, उत्तम कांबळे, डॉ. बाबा आढाव, डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. रावसाहेब कसबे, बाळकृष्ण रेणके, वीरप्पा मोईली, डॉ.भालचंद्र मुणगेकर, कुमार केतकर,डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. अरुंधती रॉय, खासदार शरद यादव आणि डॉ. मा.गो. माळी यांना प्रदान करण्यात आला आहे.