शिक्रापूर । पात्र लाभार्थी शेतकर्यांच्या कर्जमाफीची रक्कम दिवाळीपर्यंत त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, असे आश्वासन महाराष्ट्रातील जनतेला मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र दिवाळी संपून अनेक दिवस झाले तरी पुणे जिल्ह्यातील लाभार्थी शेतकर्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झालेली नाही. याच्या निषेधार्थ शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार अॅड. अशोकबापू पवार यांच्या नेतृत्वाखाली शिरूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
अॅड. अशोकबापू पवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. या सरकारने फक्त शेतकर्यांना रांगेत उभे करण्याचे काम केले. गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत आहेत. पण सरकार वेळकाढू पणाची भूमिका घेऊन शेतकर्यांना वेठीस धरत आहे. कर्जमाफीच्या पात्रतेसाठी सरकारने जाचक अटी घातल्यामुळे शेतकर्यांचा पैसा, वेळ खर्च झाला. एवढा त्रास सहन करूनही कर्जमाफी मिळत नसेल तर हे दुर्दैव आहे, असे त्यांनी सांगितले. लवकारात लवकर शेतकर्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची मागणी त्यांनी केली.
…तर रस्त्यावर उतरू
साडे तीन वर्षात केंद्र सरकार व राज्यसरकार जनतेचे प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरले असून अद्यापही विकासासाठी चाचपडत आहेत. यातील बहुतांश मंञ्याची वक्तव्ये ही अशोभनिय असून वेळीच सरकारने दखल न घेतल्यास राष्ट्रवादी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असे तालुकाध्यक्ष रवी काळे काळे यांनी सांगितले. विजेंद्र गद्रे, कुसुम मांढरे, राजेंद्र जगदाळे, मोनिका हरगुडे, बाबासो फराटे, जाकिरखान पठाण, शशिकांत दसगुडे यांनी यावेळी भाषणे केली. राजेंद्र नरवडे, सुभाष उमाप, विश्वास ढमढेरे, आबाराजे मांढरे आदी याप्रसंगी उपस्थित होते.