पुणे । शहरात साथीचे आजार बळावल्याच्या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका इमारतीसमोर गुरुवारी आंदोलन केले. यावेळी विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांच्यासह महिला शहाराध्यक्षा रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आदी उपस्थित होते. यावेळी तीन नगरसेवकांनी डॉक्टरांचा पोशाख परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध साथीचे आजार वाढत आहेत. महापालिकेचे आरोग्य प्रमुख पद गेले दोन महिने रिक्त आहे. हा विषय विधान सभेतही चर्चिला गेला आहे. प्रशासनाने आरोग्यविषयक कोणतीही काळजी घेतली नसल्याचा आरोप तुपे यांनी केला आहे. गटारांची साफसफाई न केल्यामुळे शहरात अनेक जण आजारी असल्याचेही ते म्हणाले. शहराध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बोलताना शहरात आरोग्याची अत्यंत वाईट स्थिती असल्याचे सांगितले. यावर महापालिकेने लवकरात लवकर कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली.