राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधीही देणार शेतकऱ्यांना महिन्याचा पगार

0

मुंबई : राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम उभारण्यासाठी भारतीय जनता पार्टीने आपल्या लोकप्रतिनिधींचे एका महिन्याचे वेतन देऊ केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांचे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद सदस्य आपल्या एका महिन्याचे वेतन देणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केले.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात दिल्ली येथे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चर्चा केली होती. या चर्चेचे फलित बघता सरकारकडून असलेला प्रस्ताव आणि पवारांनी सुचवलेल्या बऱ्याचशा बाबींचा समावेश कर्जमाफीत झालेला दिसत आहे. कर्जमाफी संदर्भात असलेली एक लाखापर्यंतची मर्यादा दोन लाखांपर्यंत वाढवण्याचा आग्रह आम्ही धरला होता. परिणामी राज्य सरकारने दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ केले आहे. ज्यांचे कर्ज दीड लाखांपेक्षा अधिक होते त्यांचे कर्ज वन टाइम सेटलमेंटमध्ये रूपांतरीत केले जाणार आहे. ज्यांनी नियमितपणे कर्ज भरलेले आहे त्यांना २५ हजारांपेक्षाही अधिक अनुदानाची आमची मागणी होती. परंतु राज्य सरकार २५ हजारांच्या अनुदानाबाबत ठाम राहिले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंबंधात उचललेले हे पहिले पाऊल आहे. यामध्ये काही गोष्टी जर सुटल्या असतील तर सरकारसमोर पुन्हा एकदा भूमिका मांडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे केला जाईल, असे ते म्हणाले. किमान आधारभूत किमंत देण्यासाठी आम्ही सूचित केल्याप्रमाणे राज्य कृषीमूल्य आयोग तातडीने नेमला पाहिजे. अडीच वर्षांपासून आयोग नेमलेला नाही, असेही तटकरे यांनी सांगितले.