मुंबई – राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी. त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, या मागणीसाठी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही महिला कार्यकर्त्यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनाबाहेर कांदा फेक आंदोलन करत सरकारविरोधी घोषणाबाजी केली.
नेहमीप्रमाणे दुपारी नागरिकांना मंत्रालयात सोडण्यास सुरूवात झाल्यानंतर या महिलांनी थेट सहाव्या मजल्यावर जात मुख्यमंत्री कार्यालयाच्या समोरील लॉबीत जाऊन कांदे फेकण्यास सुरूवात केली आणि राज्य सरकार आणि मुख्यमंत्री हाय हाय..च्या घोषणा देण्यास सुरूवात केली. त्यामुळे सहाव्या मजल्यावर बंदोबस्तासाठी असलेले पोलीस गोंधळात पडले. पोलिसांना नेमका काय प्रकार आहे याचा सुरूवातीला उलगडा होईना. मात्र या महिलांनी सातत्याने मुख्यमंत्री आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी कायम ठेवल्याने बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलिसांनी त्यांना रोखत लगेच अटक केली. नंतर त्यांची रवानगी मरीन ड्राइव्ह पोलीसठाण्यात केली. या आंदोलनात राष्ट्रवादी महिला आघाडीच्या किंवा पक्षातील कोणीही ज्येष्ठ पदाधिकारी सहभागी नव्हता.
याबाबत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. तूरही पूर्णपणे खरेदी केलेली नाही तसेच कांद्याला हमी भाव न दिल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. इतके सगळे होत असतानाही राज्य सरकार आपली जबाबदारी पार पाडत नसल्यामुळे राष्ट्रवादी महिला आणि युवती आघाडीच्या वतीने हे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले.