राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी चुरस!

0

सुनील तटकरे, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांची नावे आघाडीवर
जयंत पाटलांच्या नावाला बऱ्यापैकी सकारात्मकता
२९ एप्रिलला मिळणार नवा चेहरा

मुंबई :- राज्यातील महत्वाचा पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी चांगलीच चुरस होत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह विधानसभा गटनेते जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांची नावे आघाडीवर असून मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात वजन असलेले शशिकांत शिंदे यांचेही नाव या पदासाठी चर्चेत आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या राष्ट्रवादीने पक्षात मोठा फेर बदल करण्याचा निर्णय घेतला असून या पदावर कुणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागून आहे. येत्या २९ एप्रिलला पुण्यात होणाऱ्या बैठकीत या नावांपैकी एकावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राष्ट्रवादीचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पक्षाने लागोपाठ दोनदा संधी दिली आहे. तसेच तटकरे आगामी लोकसभा रायगड मतदार संघातून लढवतील, असे चिन्ह असून या तयारीसाठी त्यांना वेळ देण्याचा विचार पक्षाने केला आहे. सोबतच तटकरे यांच्यावर विरोधकांकडून भ्रष्टाचाराचे आरोप देखील झाले आहेत. त्यामुळे मागील काळात पक्षाला त्याची बरीच मोठी किंमत मोजावी लागली आहे. स्थापनेपासून सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादीला मागील काळात पक्ष सोडून जाणाऱ्यांचा मोठा फटका बसला आहे. यामुळे सध्या ४ खासदार आणि ४० आमदार इतकीच राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद उरली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये युती होणार असल्याने त्याची पुढील चर्चा नव्या प्रदेशाध्यक्षांसोबत काँग्रेसला करावी लागणार आहे. पक्षामध्ये जयंत पाटील अनुभवी नेते मानले जातात. अर्थमंत्री म्हणून त्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. सहकाराच्या राजकारणात ही पाटील सक्षम आहेत. येत्या काळात अनेक नेते आणि काही आमदारही काँग्रेस अथवा इतर पक्षात फुटून जाण्याची भीती राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. त्यासाठी सर्वसमावेशक असा चेहरा असलेले जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करणे पक्षाच्या दृष्टीने फायद्याचे ठरणार आहे. त्यासाठी खुद्द खासदार सुप्रिया सुळे यांनी जयंत पाटलांसाठी जोर लावला असल्याचे बोलले जात आहे. पाटील यांच्या नावाला असून राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचाही त्यांना सहज पाठिंबा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

दुसरीकडे राज्यात माथाडी कामगारांचे दमदार नेतृत्व शशिकांत शिंदे करत आहेत. लाखो माथाडी अन्य कामगारांमध्ये शिंदे यांचा जनसंपर्क चांगला आहे. पश्चिम महाराष्ट्रातून गेली पंचवीस वर्षे शिंदे लोकप्रतिनिधी आहेत. सध्या कोरेगाव मतदार संघाचे आमदार आहेत. त्यामुळे मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात वजन असलेल्या या चेहऱ्याचा देखील विचार केला जाऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे. तर अनुभवी नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे- पाटील यांच्याही नावाची चर्चा असल्याचे बोलले जात आहे. २९ तारखेला पुण्यात होणाऱ्या बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड होणार आहे. दरम्यान या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पदासाठी नाव निश्चित झाल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बिनविरोध निवड होयेल असे बोलले जात आहे.