राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इंधन दरवाढीचा निषेध

नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर फेकली शाई, पथनाट्याच्या माध्यमातून केंद्र सरकारवर टीका
जळगाव । राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इंधन दरवाढप्रकरणी केंद्र सरकारच्या निषेधार्थ शनिवारी मोहाडी नाक्यावर
आंदोलन करण्यात आले. पेट्रोल व डिझेल, घरगुती वापराचे गॅस सिलिंडरमध्ये दिवसेंदिवस दरवाढ होत आहे. त्यामुळे महागाई भडकत असून सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण होत आहे. याप्रकरणी पक्षातर्फे पथनाट्याच्या माध्यमातून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर शाई फेकून संताप व्यक्त करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनच्या काळातही दररोज पेट्रोल व डिझेलचे भाव वाढत आहेत. या आंदोलनाप्रसंगी प्रदीप पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी सादर केलेले पथनाट्य लक्षवेधी ठरले. वाढत्या महागाईबाबत पथनाट्यातून जनतेचा संताप व्यक्त करुन जनजागृती करण्यात आली. या वेळी केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करण्यात आली. माजी आमदार मनीष जैन व राज्य प्रवक्ते योगेश देसल यांनी इंधन दरवाढप्रकरणी केंद्र सरकारच्या धोरणावर रोष व्यक्त केला. कच्च्या तेलाचे दर खूप कमी झाले असतानाही मोदी सरकार दररोज इंधन दरवाढ करीत असल्याचा आरोप पक्षाचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी केला. जोरदार घोषणाबाजीमुळे परिसर दणाणला होता. या वेळी पक्षाचे राज्य प्रवक्ते योगेश देसले, नामदेवरा चौधरी, स्वप्निल नेमाडे, विलास पाटील, रिजवान खाटीक, अयाज मलिक, कुमाल पाटील, रमेश भोळे, गौरव लवंगे, रोहित सोनवणे, पठाण, तसेच पक्षाच्या महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र प्रमुख कल्पना पाटील, ममता तडवी,अर्चना कदम, कमल पाटील, उज्ज्वला शिंदे, शकुंतला धर्माधिकारी, जयश्री पाटील, अलका मगर, दिव्या पाटील, जुलेखा शाह आदी उपस्थित होते.