राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक नवीन गवते यांचा जामीन अर्ज फेटाळला

0

नवी मुंबई :- दिघा एमआयडीसी मधील अनधिकृत बांधकाम प्रकरणात गुन्हा दाखल असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक नवीन गवते व त्यांचे बंधू राजेश गवते यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार उभी राहिली आहे. येत्या तीन आठवड्यात नवी मुंबई पोलिसांना शरण जाण्याचे आदेश न्यायालयाने गवते यांना दिल्याने त्यांच्यावरील संकट वाढले आहे.

आरटीआय कार्यकर्ते ब्रिजेश मिश्रा यांनी दिघा एमआयडीसी मधील अनधिकृत बांधकामांचा भ्रष्टाचार बाहेर काढला असता त्यांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक नवीन गवते यांचीसुद्धा मोरेश्वर इमारत असल्याची माहिती समोर आली. कोणत्याही कायदेशीर परवानग्या न घेता इमारत उभी करून सामान्य नागरिकांची फसवणूक केली म्हणून आरटीआय कार्यकर्ते ब्रिजेश मिश्रा यांनी गवते यांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक टाळता यावी म्हणून गवते यांनी न्यायालयात जामीन अर्ज सादर केला होता.तो जामीन न्यायालयाने फेटाळल्यामुळे त्यांची तुरंगात रवानगी नक्की होणार असल्याची प्रतिक्रिया मिश्रा यांनी दिली.न्यायालयाने गवते यांना तीन सप्ताहात पोलिसांना शरण जाण्याचे आदेश दिल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.