निवडणुकीच्या पार्श्वूमीवर नव्या दमाच्या कार्याकर्त्यांवर जबाबदारी
पक्षातील युवा कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह
पिंपरी : पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ‘यंग ब्रिगेड’ आता मैदानात उतरली आहे. एव्हाना पक्षाचे नेते अजित पवार यांनीच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वूमीवर नव्या दमाच्या कार्याकर्त्यांवर जबाबदारी सोपवण्याची भूमिका घेतली आहे. तसेच, वरिष्ठ पदाधिकार्यांना आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादीच्या ‘निर्धार परिवर्तनाचा’ संपर्क यात्रेच्या निमित्ताने शनिवारी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर जाहीर सभा झाली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपविरोधात घणाघात केला. त्यातच अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा उमेदवारीबाबत संकेतही देण्यात आले. त्यामुळे आपसुकच पक्षातील युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. शहरातील दुसर्या फळीतील युवा चेहरे असलेल्या नगरसेवक मयूर कलाटे, युवा नेते संदीप पवार, माजी नगरसेवक अतूल शितोळे, राजेंद्र जगताप, भारत केसरी विजय गावडे, नगरसेवक संतोष कोकणे, विनोद नढे, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, निलेश पांढरकर, नगरसेवक पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, विक्रांत लांडे, अजित गव्हाणे, रोहित काटे, राजू बनसोडे, योगेश गवळी यांच्याकडे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील ‘किंगमेकर’ म्हणून पाहिजे जात आहे.
नवीन चेहर्यांना संधी
शनिवारी झालेल्या सभेनंतर अजित पवार यांनी पिंपरी, चिंचवड विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती केली आहे. चिंचवड विधानसभा अध्यक्षपदी गणेश भोंडवे, पिंपरीसाठी निलेश पांढरकर यांची नियुक्ती केली आहे. यापूर्वीच भोसरीतील योगेश गवळी यांना युवक राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. दुसरीकडे, पार्थ पवार यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे असल्यास त्यांच्या साथीला युवा आणि नव्या दमाच्या कार्यकर्त्यांची फौज तयार करावी लागणार, ही बाब अजित पवार यांनी लक्षात घेतली आहे. त्यामुळेच पक्ष कार्यकारणीमध्ये बदल करुन नवीन चेहर्यांना संधी देण्याबाबत हालचालींना वेग आला आहे.
अनुभवींनी मार्गदर्शक व्हावे
शहरातील पहिल्या फळीतील पदाधिकार्यांना अनेक मानाची पदे मिळाली आहेत. मात्र, अनेकांनी पक्षविस्ताराबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे दिसत नाही. अजित पवार यांना अपेक्षित असलेली पक्षबांधणी गेल्या तीन-चार वर्षांत झालेली नाही. पक्षातील दिग्गज नेते बाहेर पडल्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये ताकद असूनही पक्षाचा दबदबा दिसत नाही. नगरसेवक आणि ज्येष्ठ नेत्यांमध्ये समन्यव होण्यास अडचणी आहेत. महापौर, स्थायी समिती सभापती, उपमहापौर, विविध समित्यांये अध्यक्षपद भोगल्यानंतरही पक्ष कार्याला अनेकांनी रामराम ठोकला आहे. दुसरीकडे, अजित पवार शहरात आल्यानंतर त्यांचे मागे-पुढे करण्यात धन्यता मानणारे अनेक मानणीयांमुळे पक्ष संघटनेची धार बोथट झाली आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर अजित पवार यांनी दुसर्या फळीतील कार्यकर्त्यांना ताकद देण्याची भूमिका घेतली. अनुभवी आणि पदांचा उपभोग घेतलेल्या माननीयांनी आता मार्गदर्शक व्हावे, असे संकेतच पक्षातील ज्येष्ठांना दिले आहेत.
शहराध्यक्ष वाघेरे एकाकी
राष्ट्रवादीचे विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी मावळ लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी मावळात भेटी-गाठीही घेतल्या आहेत. पण, पार्थ पवार यांची उमेदवारी निश्चित झाल्याच्या चर्चेमुळे वाघरे यांची मोठी अडचण झाली आहे. दुसरीकडे, पक्षातील ज्येष्ठ पदाधिकारी अपेक्षीत सहकार्य करीत नसल्यामुळे बूथ बांधणी, पक्ष संघटन करताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आंदोलनाला बहुतेक नगरसेवक, माजी नगरसेवक हजेरीही लावत नाहीत. त्यामुळे आंदोलनांचा प्रभावही दिसत नाही. परिणामी, अजित पवार यांनी पुण्यातील बंगल्यावर झालेल्या बैठकीत वाघेरे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जाते. त्यामुळे पक्षात वाघेरे एकाकी पडले आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
संदीप पवार, अभय मांढरे यांचे ‘ब्रँडिंग’
‘निर्धार परिवर्तनाचा’ सभेच्या निमित्ताने संदीप पवार आणि अभय मांढरे या दोघांनी पार्थ पवार यांच्या ‘ब्रँडिंग’साठी पिंपरी-चिंचवडमध्ये रान उठवले आहे. पक्ष संघटनेत कोणत्याही पदावर नसलेले हे दोन्ही युवा नेते अजित पवार यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. सांगवी आणि संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदार संघात संदीप पवार यांनी फ्लेक्स उभारले आहेत. त्यावर पक्षाचे सर्व आजी-माजी नगरसेवक यांचे फोटो झळकत आहेत. ‘सोशल मीडिया’ आणि काही वृत्तवाहिनींनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये संदीप पवार यांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीचे समर्थन केल्याचे दिसते. दुसरीकडे, अभय मांढरे यांनीही फ्लेक्सबाजीचा धडाका लावला आहे. विशेष म्हणजे, युवा नेते संदीप पवार पिंपरी-चिंचवडच्या शहराध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. तसेच, पार्थ पवार यांची मावळ लोकसभेची उमेदवारी निश्चित झाल्यास अभय मांढरे यांच्याकडे प्रचार प्रक्रियेत महत्त्वाची जबाबदारी देण्याची चिन्हे आहेत.