पक्षाकडून सुरेश जांभुळकर यांना दिली उमेदवारी
तळेगावः वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुकीत सदस्य पदाची उमेदवारी नाकारल्याने पक्षावर नाराज झालेले राष्ट्रवादीचे युवक काँग्रेस वडगाव गट अध्यक्ष दिलीप पगडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पगडे यांनी तालुका युवकचे अध्यक्ष रमेश गायकवाड यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला. वडगाव मावळ नगरपंचायत प्रभाग क्रमांक नऊमधून राष्ट्रवादी पक्षाकडून सुरेश जांभुळकर यांना उमेदवारी देण्यात आली. पगडे यांच्या मते या प्रभागासाठी ते प्रबळ दावेदार होते. मात्र वडगाव मावळ राष्ट्रवादीमध्ये निवडणुकीच्या तोंडावर गटा तटाचे राजकारण सुरु झाले आहे. त्यातूनच पगडे यांची उमेदवारी नाकारत जांभुळकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे पगडे यांनी युवक काँग्रेस वडगाव गट अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
पगडे यांची संघटनेतील क्रियाशील कार्यकर्ते म्हणून ओळख होती. प्रभाग क्रमांक नऊ मधून प्रबळ दावेदार म्हणून त्यांचे नाव पुढे येत होते.मात्र सर्व समीकरणे बदलत जांभुळकर यांना उमेदवारी देण्यात आल्याचे पगडे यांनी सांगितले. पगडे यांनी त्यांची पुढील रूपरेषा अद्याप जाहीर केली नसून पगडे यांच्या राजीनामा केवळ युवक काँग्रेस वडगाव गट अध्यक्ष पदाचा आहे की पक्षाचा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.