राष्ट्रवादी नगरसेविकेचा पती अ‍ॅड. सुशील मंचरकरला अटक

0

पिंपरी-चिंचवड : खराळवाडी येथील माजी नगरसेवक कैलास कदम यांच्या खुनाची सुपारी दिल्याप्रकरणी अ‍ॅड. सुशील मंचरकर याच्यासह तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पिंपरी येथे शुक्रवारी दुपारी अटक केली. न्यायालयाने तिघांना 19 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सुशील मंचरकर याच्यासह सुरेश स्वामीनाश झेंडे (वय. 29 रा. दत्तराज कॉलनी पवनानगर), राजू उर्फ काल्या महादेव पात्रे (वय. 32 रा. विद्यानगर चिंचवड) यांचा समावेश असून या प्रकरणातील संतोष मच्छिंद्र जगताप, संतोष उर्फ लुब्या चिंतामनी चांदिलकर, धर्मा कांबळे हे आरोपी फरार आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंचरकर याला शुक्रवारी राहत्या घरून अटक करण्यात आली.

गुंतागुंतीच्या प्रकरणाचा उलगडा
वेगवेगळ्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगारांना पुणे पोलिसांनी सातारा, खंडाळा येथील न्यायालयात नेले असताना तेथून परत येताना हे गुन्हेगार पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाले असे सुरुवातीला दर्शविण्यात आले. मात्र हे गुन्हेगार पिंपरी मोरवाडी येथील न्यायालयासमोरून पळून गेल्याचे स्पष्ट झाल्याने तपासासाठी पिंपरीकडे गुन्हा वर्ग करण्यात आला. गुन्हे शाखा तपास करत असताना फरारी गुन्हेगार सापडले.

रचला कट, दिले पैसे, पुरविली पिस्तुल
गुन्हेगारांकडू मिळालेल्या माहितीनुसार मंचरकर याने आरोपींशी ओळख झाल्यानंतर त्यांच्या सोबत माजी नगरसेवकाला मारण्यासाठी कट रचला यानुसार 30 लाख रुपये व शस्त्र पुरविण्याचे ठरले. मात्र त्यांना जामिनावर तुरुंगातून बाहेर काढणे वेळखाऊ असल्याने पिंपरी येथील न्यायालयातून त्यांना पळवून नेण्याचे ठरले. त्यानुसार चांदिलकर, पात्रे, जगताप यांना झेंडेच्या सहाय्याने पिंपरी न्यायालयातून पळवून नेले. पुढे झेंडे याच्यामार्फत मंचरकर याने या कामासाठी आगाऊ पाच लाख रुपये तीन पिस्तूल व 30 जिवंत काडतुसे व इतर सामग्री दिली. दरम्यान पोलिसांनी झेंडे व पात्रे याला अटक केल्याने खुनाचा कट उधळला गेला. आरोपी फरार झाल्यानंतरही मंचरकर हा त्यांच्या संपर्कात असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी
पिंपरी येथील माजी नगरसेवक, तसेच नेहमीच मंचरकर यांच्याशी राजकीय वैमनस्य असणारे कैलास कदम यांच्या खुनाची सुपारी देण्यात आल्याचे या गुन्हेगारांनी कबुली दिली. त्यानुसार तिघांनाही न्यायालयात हजर केले असता तिघांना 19 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.