पुणे : शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या एका पदाधिकार्याच्या खुनाचा कट पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला असून, खुनासाठी तब्बल एक कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपींना पकडल्यानंतर हा प्रकार समोर आला तर, त्यांचे दोन साथीदार फरार आहेत. आनंद शिवकुमार भोपे (वय 38, रा. हडपसर), अनंत दत्तात्रय मोढवे (वय 42, रा. अहमदनगर), नितीनकुमार मच्छींद्र पिसे (वय 27, रा. भिगवण रेल्वे स्टेशन, ता. इंदापूर) आणि बंटी उर्फ ओंकार जालिंदर बेंद्रे (वय 21, रा. चिलवडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
जमीनविक्रीत फसवणूक झाल्याने हत्येचा कट
बंटी उर्फ ओंकार बेद्रे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर कर्जत आणि अहमदनगर पोलिस ठाण्यात खुनाचे दोन गुन्हे दाखल आहेत. तो एका गुन्ह्यात गेल्या दीड वर्षापासून फरार आहे. तर फरार आरोपीवर करमाळा पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. आरोपी आनंद भोपे हा या खुनाच्या कटामागील मुख्य सूत्रधार आहे. यातील फिर्यादी हे राजकीय पक्षाचे एका भागाचे अध्यक्ष आहेत. त्यांची अडीच एकर जमीन पॉवर ऑफ ऑटोर्नीकरून विक्री करण्यासाठी दिली होती. भोपे यांने फिर्यादींच्या परस्पर त्यांची स्वाक्षरी करून काही जमिनींची विक्री केली. काही व्यवहारातील पैशांची रक्कमही दिली नाही. परस्पर विक्री केलेल्या जमिनीची माहिती फिर्यादीला समजल्यामुळे त्याने खुनाचा कट रचला. अनंत मोढवे, नितीनकुमार पिसे, बंटी बेंद्रे व फरार दोघांना खुनाची सुपारी दिली. खून करण्यासाठी तब्बल एक कोटी रुपये ठरविले. त्यातील पहिला हप्ता म्हणून 15 लाख रुपये दिले. भोपे यांने त्यानंतर वेळोवेळी आरोपींना एकूण 32 लाख रुपये दिले. दरम्यान, गुन्हे शाखेचे दरोडा प्रतिबंधक पथक अहमदनगर येथे तपासासाठी गेले होते. त्यावेळी बातमीदारामार्फत माहितीनुसार, अहमदनगरमधील एका हॉटेलवर छापा टाकून बंटी उर्फ ओंकार आणि नितीनकुमार पिसे याला पकडले. त्यांच्याकडे तपास केला. त्यावेळी त्यांनी खुनाची सुपारी घेतल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी इतर दोघांना पकडले. ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम, सहाय्यक निरीक्षक विद्युलता चव्हाण, उपनिरीक्षक संजय दळवी, कर्मचारी यशवंत आब्रे, शंकर पाटील, विनायक पवार, दीपक निकम, नीलेश पाटील व त्यांच्या पथकाने केली.