राष्ट्रवादी पक्षाने घेतलेला निर्णय पूर्णतः मान्य!

0

नगरसेवक नाना काटेंची भूमिका

पिंपरी : मागील काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेतेपद मिळण्या संदर्भात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर बैठक झाली. बैठकीत त्यांनी विरोधी पक्षनेतेपदी संधी देण्याचे आश्‍वासन दिले होते, पण तसे झाले नाही. पक्षाने घेतलेला निर्णय आपल्याला मान्य आहे, अशी भूमिका विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्यानंतर नगसेवक नाना काटे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

राष्ट्रवादीचा दबदबा नाही
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीचे केवळ 36 नगरसेवक निवडून आले होते. पाहिल्यांदाच विरोधी पक्षात बसलेल्या राष्ट्रवादीने योगेश बहल यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपविली होती. मात्र, योगेश बहल यांना सत्ताधारी भाजपच्या विरोधात ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे वर्षभरात विरोधक म्हणून राष्ट्रवादीचा फारसा दबदबा दिसला नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेता बदल्याची चर्चा सातत्याने सुरू होती. दरम्यान, एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर नुकताच योगश बहल यांनी राजीनामा देऊ केला.

त्यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधी पक्षनेतेपदी नगरसेवक नाना काटे व दत्ता साने यांची नावे आघाडीवर होती. मात्र, अजित पवार यांनी दत्ता साने यांच्यावर नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे नाना काटे नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यावर नाना काटे यांनी पक्षाने घेतलेला निर्णय मान्य असल्याची भुमिका स्पष्ट केली आहे. तसेच, यानंतर पक्षाकडून मिळणारी जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडू, असेही नाना काटे यांनी स्पष्ट केले आहे.