कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला ; रेल्वे स्थानकापासून काढली मिरवणूक
भुसावळ- तब्बल पावणेदोन वर्षानंतर राष्ट्रवादीत प्रवेश करून परतलेल्या माजी आमदार संतोष चौधरींचे सोमवारी भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन झाल्यानंतर चौधरी समर्थकांसह राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी त्यांचे जंगी स्वागत करीत ढोल-ताशाच्या गजरात रेल्वे स्थानकापासून प्रवेशद्वारापर्यंत मिरवणूक काढली. दोन दिवसांपूर्वी चौधरी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ते सोमवारी शहरात सकाळी साडेसात वाजता डाऊन मुंबई वाराणसीने परतल्याने त्यांचे स्वागत करण्यात आले.
चौधरींच्या आगे बढोच्या घोषणांनी दणाणला परीसर
रेल्वे स्थानकावर गाडी आल्यानंतर समर्थकांनी ‘संतोषभाऊ चौधरी आगे बढो’ च्या घोषणा देत परीसर दणाणून सोडला. प्रसंगी माजी आमदार संतोष चौधरींची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. रेल्वे स्थानकाबाहेरील दर्ग्याचे दर्शन घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी युवा कार्यकर्ते सचिन चौधरी, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील, गटनेता उल्हास पगारे, पत्रकार संजयसिंग चव्हाण, ईकबाल सरदार, दुर्गेश ठाकूर, सचिन पाटील, नितीन धांडे, रवी सपकाळे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सोपान भारंबे, पंढरीनाथ पाटील, शेख पापा शेख कालू, अनिल मनवाडे, तसेच फैजपूरचे उपनगराध्यक्ष शेख कुर्बान, शेतकी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक यांच्यासह शेकडो चौधरी समर्थक व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शहर व तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.