मुंबई – महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने गरजेच्या असलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सवर केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू केल्याच्या निषेधार्थ गुरूवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांना ‘सॅनिटरी नॅपकिन्स’ची भेट पाठवून निषेध आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाविषयी बोलताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सरचिटणीस सोनल पेडणेकर म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसने महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे. याआधीही सॅनिटरी नॅपकिन्सवरील जीएसटी रद्द व्हावा, या मागणीसाठी आम्ही चित्रा वाघ यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रत्यक्ष भेटून याबाबतचे निवेदनही दिले होते. त्यावेळी महाराष्ट्र सरकारने सॅनिटरी नॅपकिन्सवरील कर रद्द करण्याबाबत केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना विनंती करू, असे आश्वासन दिले होते. परंतु त्यानंतरही सॅनिटरी नॅपकीन्सवर जीएसटी कायम ठेवण्यात आला आहे. यावरून स्त्रियांच्या आरोग्याबाबत हे सरकार असंवेदनशील आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे या सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी व तमाम महिलावर्गाची भावना पंतप्रधान व अर्थमंत्र्यापर्यंत पोहचिवण्यासाठी सॅनिटरी नॅपकीन्सची भेट त्यांना पाठविण्यात आली आहे.
सरकारने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार केला नाही तर महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या नेतृत्त्वाखाली रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. प्रदेश सरचिटणीस मनीषा गांगण, कल्पना शिर्के, प्रदेश प्रतिनिधी भारती चौधरी, कामिनी जाधव, सुनिता निवळे, तारा मालवणकर आदींनी या आंदोलनात भाग घेतला.