राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पालिकेवर ’जवाब दो’ मोर्चा

0

बांधकामे नियमीत, शास्ती माफ, मेट्रो निगडीपर्यंत, रिंगरोड विषयांचे निवेदन
पिंपरी-चिंचवड : अनधिकृत बांधकामे नियमीत करणे, शास्तीकर पूर्णपणे माफ करणे, मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी, रिंगरोड रद्द करावा अशा विविध मागण्यासाठी आणि शहरातील विविध प्रलंबित प्रश्‍नांचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने गुरुवारी महापालिकेवर ’जवाब दो’ मोर्चा काढला. चिंचवड स्टेशनपासून या मोर्चाला सुरुवात झाली. सिटी मॉल मार्गे हा मोर्चा पालिकेवर येऊन धडकला. आयुक्त श्रावण हर्डीकर अनुपस्थित होते. त्यामुळे प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांना शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन दिले.

सळो की पळो करू : कोते
प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील म्हणाले, महापालिकेत भाजपची सत्ता येऊन पाच महिने झाले. या पाच महिन्यात शहराची वाट लागली आहे. शास्तीकर पूर्णपणे माफ झाला पाहिजे. अनधिकृत बांधकामे नियमित झाली पाहिजेत. शहरातील प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रशासनाला ठराविक कालावधी देण्यात येईल. यावेळेत पालिका प्रशासनाने प्रलंबित प्रश्‍नांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा अधिक आक्रमकपणे आंदोलन करुन ’सळो की पळो’ करुन सोडल्याशिवाय राहणार नाही.
संजोग वाघेरे म्हणाले, रुपीनगर परिसरातील नागरिकांना शास्तीकर भरावा म्हणून पालिका नोटीसा पाठवत आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. पालिकेने नागरिकांना नोटीसा पाठवू नयेत. बोपखेलच्या पुलाचा प्रश्‍न सुटला पाहिजे. शहरातील नागरिकांना नियमित व पुरेशा दाबाने पाणी मिळाले पाहिजे.

यांची होती उपस्थिती
कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, विरोधी पक्षनेते योगेश बहल, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, महिला अध्यक्षा व नगरसेविका वैशाली काळभोर, ज्येष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे, नाना काटे, अतुल शितोळे, प्रशांत शितोळे, माजी महापौर व नगरसेविका मंगला कदम, डॉ. वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, नगरसेविका उषा वाघेरे, माई काटे, निकिता कदम, संगीता ताम्हाणे आदी नगरसेवक-पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.