राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे 100 मोर्चे

0

पिंपरी-चिंचवड । केंद्र आणि राज्य सरकारने आणलेल्या विविध योजना फसल्या आहेत. सरकार नुसत्याच घोषणा करीत आहे. कृती मात्र शून्य आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस आगामी काळात राज्यात विविध ठिकाणी 100 मोर्चे काढणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी दिली. तसेच राज्यभरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या दोन हजार शाखा काढण्याचे उद्दीष्ट असून त्यापैकी 700 शाखा काढण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. पिंपरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यात 35 मेळाव्यांचे आयोजन
राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे राज्यभरात मोठ्या प्रमाणावर जनजागरण मोहीम सुरू आहे. राज्यातील 15 महापालिका, सर्व प्रांताधिकारी कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये आणि विभागीय आयुक्त कार्यालयांवर त्या-त्या परिसरातील समस्यांसाठी मोर्चे काढले जाणार आहेत. राज्यात 35 युवक मेळावे आयोजित केले जाणार आहेत असे सांगत कोते पाटील म्हणाले, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यासाठी वेळ देण्याचे मान्य केले आहे.

2 डिसेंबरला पिंपरीत धनंजय मुंडे
22 नोव्हेंबर रोजी उत्तर महाराष्ट्राचा युवा मेळावा नाशिक येथे आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यात शरद पवार युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. 2 डिसेंबर रोजी पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसने युवा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत, असेही कोते पाटील यांनी सांगितले.