राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे मोदी सरकार विरोधात आंदोलन

0

धुळे । शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष कुणाल संजय पवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणाचा जाहीर निषेध करीत आज शहरात अनोखे गांधीगिरी आंदोलन केले. मनोहर टॉकीज जवळील शिवाजी पुतळ्या समोरील श्रीराम पेट्रोल पंपावर वाहनात पेट्रोल भरणार्‍या ग्राहकांना युवकांनी तोंडात साखर भरविली. पेट्राल-डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ होऊनही तुम्ही गुमानं पेट्राल भरता त्यामुळे तुमचे आम्ही कौतुकच करतो असा त्या आंदोलनाचा आशय होता. त्याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने एक पत्रकही प्रकाशीत केले.

अंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलचे दर कमी तर देशात वाढीचा निषेध
पत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही आज इंधन दरवाढीविरोधात साखर वाटून आंदोलन करीत मोदी सरकारचा निषेध करीत आहोत. जगभरात पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती कमी होत आहेत. परंतु, भारतात मात्र दरामध्ये सतत वाढच होत आहे. इंधनाच्या किंमती वाढल्यामुळे सर्वच वस्तू, किराणा, भुसार, कडधान्य भाजीपाला वाहतुकीच्या दरातही भरमसाठ वाढ होते आहे. एकूणच हा प्रकार म्हणजे महागाई वाढवण्याचाच भाग आहे. यातून केंद्र सरकार आम जनतेच्या खिशालाच कात्री लावण्याचे काम करीत आहे. आज आमच्याकडे पट्रोल साधारण 80 रुपयाच्या आसपास अथवा अधिक दराने विकले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाच्या किंमती मात्र त्यामानाने कमी आहेत. ह्या किंमती कमी झाल्यावरच जनतेला त्यातून दिलासा मिळेल. त्यासाठी झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्र सरकारला मात्र जागे करावे लागेल. या आंदोलनावेळी निलेश गवळी, संदीप हजारे, दिनेश पोतदार,रोहीत सुडके, भोला सैंदाणे, सोनू भदाणे, निलेश धुमाळ, अंबादास मराठे, बबलु कलिम, राजेंद्र हारळ, राजु सुपनर, राजदीप काकडे, एजाज शेख, युगंदर भदाणे, अरविंद पाटील आदी उपस्थित होते.