राष्ट्रवादी पुन्हा…

0

चेतन साखरे(9890618263): ‘आवाज जनतेचा… दाही दिशातून घुमला… राष्ट्रवादी पुन्हा’ हे गुणगुणत विरोधात बसणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज शिवसेनेमुळे अचानक सत्तेत भागीदार झाला आहे. तब्बल पाच वर्षानंतर या सत्तेतील भागीदारीचा आता फायदा होणार अशी शक्यता राज्यासह जिल्ह्यांमधील अनेक कार्यकर्त्यांना वाटू लागली. मात्र, जळगाव जिल्हा त्याला अपवाद ठरत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. राज्यात आपण सत्तेत आहोत की, विरोधात आहोत ह्याच संभ्रमात जिल्हातील राष्ट्रवादी काँग्रेस आहे.

जळगाव जिल्हा तसा युतीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, सन 2009 मध्ये राष्ट्रवादीचे सहा आमदार होते. तसेच सहकारी संस्थाही ताब्यात होत्या. 2014 च्या लोकसभा निवडणूकीपासून राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था खिळखिळी झाली. सन 2014 मध्ये युती सत्तेत आल्यानंतर जिल्ह्यातील जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या या ठिकाणी भाजपाने वर्चस्व मिळविले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव डॉ. सतीश पाटील हे आमदार म्हणून निवडून आले होते. 2014 ची स्थिती 2019 मध्येही जैसे थेच राहिली. यावेळी देखील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव अनिल भाईदास पाटील हे आमदार म्हणून निवडून आले. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढलीच नाही. ही ताकद का वाढली नाही? याला अनेक कारणे देखील आहेत.

जिल्ह्यात गटबाजीचे ग्रहण
जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांची संख्या कमी अन् नेत्यांची संख्या अधिक अशीच अवस्था आहे. या पक्षात प्रत्येक जण स्वयंभू नेता म्हणून स्वत:ला मिरवतांना दिसतो. मी म्हणजे आमदारच अशा काही अर्विभावात या पक्षातील कार्यकर्ते वावरतांना दिसतात. आणि या स्वयंभू आमदारांभोवती घिरट्या मारणार्‍यांचा गोतावळा नेहमीच दिसतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी जनतेत जाऊन काम करा, असा सल्ला दिला आहे. मात्र या वडीलधार्‍या नेत्यांचा सल्लाच राष्ट्रवादी काँग्रेस विसरलेली दिसतेय. पक्षातील गटबाजी त्याला मुख्य कारण ठरत आहे.

10 नेत्यांची तोंडे 10 दिशेला
या पक्षातील 10 नेत्यांची तोंडे 10 दिशेला आहेत. त्यामुळे संघटना कमकुवत झाली आहे. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माजी खा. ईश्वरलाल जैन, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, माजी खा. अ‍ॅड. वसंतराव मोरे, जिल्हा बँकेचे संचालक अ‍ॅड. रवींद्र पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, राजीव देशमुख अशी मातब्बर मंडळी असतांनाही या पक्षाची अवस्था म्हणजे एक गाव अन् बारा भानगडी अशीच झाली आहे.

कुणाचा पायपोस कुणातच नाही
खासदारकीची टर्म संपल्यापासून ईश्वरलाल जैन हे पक्षापासून दूरच आहेत. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून डॉ. सतीश पाटील हे तर शेतीत मग्न झाले आहेत. माजी खा. वसंतराव मोरे यांचे वय झाल्याने त्यांनादेखील मर्यादा आल्या आहेत. माजी मंत्री गुलाबराव देवकर हे देखील मजूर फेडरेशनच्या कार्यालयातून समांतर राष्ट्रवादीची अंमलबजावणी कायम ठेवून आहेत. जिल्ह्याची धुरा आहे ती संत मुक्ताईचे वारकरी अ‍ॅड. रवींद्र पाटील यांच्यावर. आता जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांना साथ मिळत नसल्याने म्हणा की, त्यांचे दौरे होत नसल्यानेच राष्ट्रवादीचे संघटन खिळखिळे झाले आहे. कुणाचाच पायपोस कुणातच नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. राज्यात सत्ता असतांनाही त्याचा फायदा शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत होत नसल्यानेच जिल्ह्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व नगण्यच असल्याचे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.