पिंपरी-चिंचवड :- राष्ट्रवादी काँग्रेसचा 20 वा वर्धापनदिन आहे. पक्षाचा स्थापना दिन व पश्चिम महाराष्ट्रातील `हल्लाबोल’ची सांगता यानिमित्त उद्या पुण्यात मेळावा होणार आहे. या मेळाव्याला पिंपरी-चिंचवड शहरातून पक्षाचे 15 हजार कार्यकर्ते व पदाधिकारी जाणार आहेत. विधानसभानिहायक पाच हजार कार्यकर्ते मेळाव्याला नेण्याचे टार्गेट नेत्यांना देण्यात आले आहे.
यांची राहणार मेळाव्याला उपस्थिती
उद्या (रविवारी) दुपारी चार वाजता हा मेळावा पुण्यातील सहकारनगर, येथील सौ.ल.रा.शिंदे हायस्कूलच्या प्रांगणात होणार आहे. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मेळाव्याला संबोधित करणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ हे उपस्थित राहणार आहेत.
15 हजार कार्यकर्ते जाणार
आतापर्यंतच्या तीन सांगता सभेपैकी हल्लाबोलच्या या सभेला सर्वात जास्त गर्दीचे लक्ष्य राष्ट्रवादीचे आहे. पक्षाच्या बालेकिल्यात ही सभा होत आहे. त्यामुळे येथे ताकद दाखवून देण्याचा पक्षाच्या नेत्यांचा विचार आहे. 2019 च्या तयारीची चाचपणीही यातून ते करणार आहेत.
विधानसभानिहाय पाच हजार कार्यकर्ते नेण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघातून एकूण 15 हजार कार्यकर्ते जाणार आहेत. आजी, माजी नगरसेवक, वीस सेलचे प्रमुख आणि इतर पदाधिका-यांवरही कार्यकर्ते नेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दुपारी चारची वेळ मेळाव्याची आहे. मात्र, दुपारी तीन वाजताच पिंपरीतून कार्यकर्त्यांची वाहने पुण्याला रवाना होणार आहेत. प्रत्येक वाहनाची जबाबदारी त्या-त्या पदाधिका-यांवर निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे सरचिटणीस व प्रवक्ते फजल शेख यांनी दिली.