जळगाव। एनसी.सी. च्या माध्यमातून राष्ट्राचा विकास करण्याची जिद्द अनेकांना मोठ्या पदावर जाण्यासाठी महत्त्वाची ठरते. मी स्वत: एन.सी.सी.छात्रसैनिक होतो. त्याचा मला अभिमान आहे. माझ्या आजवरच्या आयुष्यात एन.सी.सी.ची भूमिका महत्वाची राहिलेली आहे, असे मत 18 महाराष्ट्र बटालियनचे कर्नल दिलीप पांडे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संबोधीत करतांना व्यक्त केले. मू.जे. महाविद्यालयात एन.सी.सी. विभागाच्या वतीने यु.पी.एस.सी. परीक्षेत उत्तीर्ण डॉ. सौरभ सोनवणे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
एन.सी.सी.मुळेच युपीएससीला मदत
डॉ. सौरभ सोनवणे हे 2007 मध्ये मू.जे. महाविद्यालयात एन.सी.सी. प्रवेशित होते. त्यावर्षी त्यांनी दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताकदिनाच्या ठ. ऊ. झरीरवश मध्ये महाविद्यालयाचे व बटालियनचे प्रतिनिधित्व केले होते. दरम्यान, कार्यक्रमात यु.पी.एस.सी.परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना डॉ. सौरभ सोनवणे यांनी, घरच्यांचा विरोध पत्करून दिल्लीला जाता यावे म्हणून एन.सी.सी.ला प्रवेश घेतला आणि कठोर मेहनत घेतली. त्यामुळे विविध प्रकारच्या प्रशिक्षणामुळे यु.पी.एस.सी. परीक्षेची मुलाखत देतांना एन.सी.सी.चा जास्त उपयोग झाला असे सांगितले.
आयुष्याला लागते शिस्त
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी म्हणाले की, एन.सी.सी.मुळे तुमच्या भावी आयुष्याला शिस्त लागते. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात आत्मविश्वासाने वावरू शकता. महाविद्यालयाने सुरु केलेल्या एस.एस.बी. ट्रेनिंगला विद्यार्थ्यानी अधिकाधिक प्रतिसाद द्यावा असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेफ्टनंट डॉ.बी.एन.केसूर यांनी केले. यावेळी एन.सी.सी.छात्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.