राष्ट्रावादीचे कार्यकर्ते शेतकरी नाहीत का?

0
मुंबई:- शेतकरी संपादरम्यान अटक झालेले सर्वाधिक शेतकरी हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. मात्र राष्ट्रवादीचा पायाच शेतकरी आहे असे सांगत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शेतकरी असू शकत नाहीत का? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रवक्ते नवाब मलिक, आ. हेमंत टकले उपस्थित होते.  यावेळी तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त 10 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात बळीराजाची सनद राज्यभर दिली जाणार असल्याची माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिवस बळीराजाला समर्पित असून अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली.
राष्ट्रवादी नेत्यांचे महाराष्ट्रभर दौरे
– शेतकरी संप आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी 11 तारखेपासून राष्ट्रवादीचे नेते राज्यव्यापी दौरे करणार असल्याची माहिती तटकरे यांनी यावेळी दिली. मराठवाड्यात 11 जून ते 18 जून, 22 ते 25 उत्तर महाराष्ट्र , शेवटच्या आठवड्यात कोकण, पुढच्या महिन्यात विदर्भातील 11 जिल्ह्यांचा दौरा करणार असल्याचे सांगितले. संघटना उभी करण्यासाठी हे दौरे असून सामाजिक, शैक्षणिक प्रश्न समजून घेणे, अभ्यासक आणि तज्ञाची मते जाणून घेणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
सरकारची भाषा अशोभनीय
संघर्षयात्रेत राष्ट्रवादीची प्रमुख भूमिका, शेतकरी संपला आमचा पूर्ण  पाठिंबा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बेस शेतकरी हाच आहे. अटक झालेल्या शेतकऱ्यांत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत कारण आम्ही देखील शेतकरी आहोत. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करणाऱ्यांना गुंड म्हणत असतील तर ते अत्यंत चुकीचे आहे, त्याला आमचा आक्षेप आहे.सरकारची ही  अशोभनीय भाषा आहे, असे तटकरे म्हणाले. राज्यसरकार किती शेतकऱ्यांच्या मरणाची वाट पाहत असल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या भावना सरकारच्या नाकर्तेपणामुळे अतिशय तीव्र झाल्या आहेत, असा आरोप तटकरे यांनी केला. शेतकऱ्यांची विटंबना करणे सरकारने थांबवावे, असेही ते म्हणाले.
शिवसेनेचे नौटंकी
यावेळी तटकरे यांनी सत्ताधारी मित्रपक्षांवर देखील निशाणा साधला. भाजप मित्रपक्षांना कसं वापरतेय हे चित्र स्पष्ट आहे. शिवसेनेची नौटंकी थांबण्याचे नाव घेत नसल्याचे सांगितले.  सत्तेसाठी लाजिरवाणा प्रकार चालू आहे, असे ते म्हणाले.