राष्ट्रीयकृत बँकेचे एटीएम ठरताहेत ‘शो-पिस’

0

जळगाव : राष्ट्रीयकृत बँका सेवेच्या नावाखाली ग्राहकांकडून सेवा शुल्काच्या नावाखाली प्रचंड आर्थिक लुट करीत आहे. मात्र शुल्क घेऊन देखील राष्ट्रीयकृत बँक सेवा देत नसल्याचे दिसून येत आहे. रविवारी स्टेशनरोड, गोलाणी मार्केट, स्टेडीयम परिसरातील सर्वच राष्ट्रीयकृत बॅकांचे एटीएम बंद असल्यासने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. शहरातील राष्ट्रीय बँकांचे एटीएम हे नागरिकांसाठी केवळ शो-पिस ठरत आहे. खाजगी बँकांचे एटीएम काही ठिकाणी सुरु होते. त्यामुळे खाजगी बँकांच्या एटीएमवर प्रचंड गर्दी उसळली. मात्र खाजगी बँक किती रक्कम पुरवणार हा मोठा प्रश्‍न असल्याने ते देखील बंद पडले.

रविवारचा दिवस असल्याने चाकरमान्यासाठी हा खरेदीचा दिवस होता. मात्र एटीएम मशिन तांत्रिक कारणाने तसेच कॅश उपलब्ध नसल्याने सेवा देण्यास असमर्थ ठरल्या. गरजेच्या वेळी एटीएम मधुन पैसे निघत नसल्याने नागरिकांमध्ये राष्ट्रीयकृत बँकाबद्दल नाराजी पसरली. शाखा बाह्य एटीएममधुन तीन पेक्षा अधिक व्यवहार केल्यास राष्ट्रीयकृत बँकाकडून दंडात्मक शुल्क आकारण्यात येते. मात्र शाखेचे एटीएम नेहमीच बंद राहत असल्याने नाहक दंड ग्राहकांन सोसावा लागतो आहे.