तळोदा/नंदुरबार । हिंदुस्थान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक तथा प्रखर राष्ट्रप्रेमी व शिवप्रेमी पु.संभाजी भिडे गुरूजी यांचे प्रखर राष्ट्राभिमान जागवणारे जाज्वल्य विचार ऐकून काल अवघी तरूणाई प्रभावित झाली. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या महान राष्ट्रकार्याची प्रचिती आणून देणारे विचार भिडे गुरूजी यांच्या व्याख्यानातून तरूणांना ऐकायला मिळाले. तळोदा येथे बामन बापूजी कार्यालयात काल दि. 26 मे रोजी हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन व संस्थापना न्यासच्यावतीने संभाजी भिडे गुरूजी यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. तर नंदुरबार येथे श्रॉफ हायस्कुलच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दोन्ही सभांच्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. नंदुरबार येथील सभेच्या ठिकाणी पोलिस उपअधीक्षक रमेश पवार यांनी जातीने बंदोबस्त हाताळला.
रक्तात संस्कृतीचा अभाव म्हणजे वांझपणा…
आपल्या प्रखर वाणीतून पु. संभाजी भिडे गुरूजी म्हणाले की, शिवाजी महाराज स्वराज्यासाठी जगले मृत्यू जिव्हेवर होता. सतत मृत्यू पाठलाग करीत असतांना 289 लढाया केल्या. जीवनात माघारी फिरून बघितले नाही व शत्रुच्या मढ्यावर पाय ठेवून रायगडावर स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या विचारांना जिवंत ठेवण्यासाठी रायगडावर 32 मण सोन्याचे सुवर्ण सिंहासन स्थापन करण्याची संकल्पना संभाजी भिडे गुरूजी यांनी येथे व्यक्त केली. त्यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, आज देशभक्ती व राष्ट्रभक्ती अभावी देश रक्तबंबाळ होत आहे. राष्ट्रीयत्वाची कमतरता असल्यामुळे रक्तात स्वाभिमान व देशाभिमान नसल्यामुळे हिंदुस्थान दुखी आहे. पुरूषात पुरूषत्व आणि स्त्रीमध्ये स्त्रीत्व नसेल तर मुले जन्माला येणार नाही तशी अवस्था देशाची राष्ट्रीयत्वाच्या अभावमुळे झाली आहे. म्हणून या देशाचे रक्षण करायचे आहे. धरती, माती, धर्म, संस्कृती, परंपरा यांचा अभिमान आपल्या रक्तात येत नाही, तोपर्यंत आपण राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीने वांझ आहोत. आपल्या या कमकुवत पणाचा फायदा घेत लांडगे देश तोडून खातील, असे श्री संभाजी भिडे गुरूजी म्हणाले.
शिवाजी जगण्याचा मुलमंत्र
देशातील तरूणांना सिंहाचेसारखे जगायचे असेल शिवाजी सारख्या सिंहाच्या विचाराने जगावे लागेल. सर्वांनी शिवतेज तनाने, मनाने, कल्पनेने प्यावे तरच तुम्ही तसे निमजणार. छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी यांचे व आपले नाते निखार्यासारखे आहे. त्याच्यात धग असली की हातात धरता येत नाही. तेव्हा तुम्ही सूर्यासारखे व्हा. सुर्य आहे तर सृष्टी आहे. असेच नाते हिंदु समाजाचे शिवाजी व संभाजी यांच्याशी आहे. शिवाजी म्हणजे जगावे कसे व संभाजी म्हणजे मरावे कसे? याचा बीजमंत्र आहे, असे संभाजीराव भिडे रांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तळोदा येथे पराग राणे, पुष्पेंद्र दुबे, अमन जोहरी, राज चौधरी आदींनी तर नंदुरबार येथे नरेंद्र तांबोळी, डॉ. नरेंद्र पाटील, दिग्वीजय ठाकूर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांसह ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्ग उपस्थित होता.