राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल

0

पुणे । मॉडर्न पेंटॅथलॉनच्या आठव्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राने जोरदार सुरुवात करताना पहिल्या दिवसावर वर्चस्व गाजविले. वरिष्ठ, युवा आणि कुमार अशा तीनही विभागात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी निर्विवाद वर्चस्व राखून सलग आठव्यांदा सर्वसाधारण विजेतेपद मिळविण्याकडे आगेकूच केली. स्पेनमध्ये होणार्‍या जागतिक बायथले आणि ट्रायथले स्पर्धेसाठी भारताचा संघ या स्पर्धेतून निवडला जाणार असल्यामुळे स्पर्धेत चांगलीच चुरस दिसून आली. वरिष्ठ विभागात पुरुषांमध्ये गतविजेत्या विराज परदेशी याने 800 मीटर धावणे आणि 100 मीटर जलतरण प्रकारात अग्रस्थान राखताना 24 मिनिटे 45.72 सेकंद अशी वेळ दिली. कुमार विभागात मुलांमध्ये पहिले तीनही क्रमांक महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मिळविले. यामध्ये अजिंक्य बालवडकर याने 19 मिनिट 39.34 सेकंद अशी वेळ देत बाजी मारली.

या खेळाडूंची कामगिरी
सौरभ पाटील, आणि सूरज रेणुसे यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळविला. युवकांच्या ई विभागात पुरुषांमध्ये महाराष्ट्राला शह बसला. राजस्थानच्या हेमंत कुमार याने 6 मिनिट 14.83 सेकंद अशी सरस वेळ देत सुवर्णपदक जिंकले. त्याचाच संघ सहकारी राज जटावत दुसर्‍या, तर महाराष्ट्राचा अबीर धोंड तिसर्‍या स्थानावर राहिला. याच विभागात महिलांमध्ये मात्र, तीनही क्रमांक महाराष्ट्राने मिळविले. अनुभवी वैष्णवी अहेर हिने 6 मिनिट 25.02 सेकंद वेळ देत सुवर्णपदक पटकावले. रुजुता कुलकर्णी, विधिका परमार दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर राहिल्या.