मुंबई: केंद्र सरकारकडून प्राप्त होणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या निधीत घोटाळा झाल्याचे आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. राज्य सरकारला प्राप्त होणाऱ्या निधीत सुमारे ४०० कोटींचा घोटाळा झाल्याचा मोठा आरोप फडणवीस यांनी केला आहे. सेवेत कायम नियुक्त्या देण्याच्या नावाखाली हा घोटाळा झाला असून देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देऊन चौकशीची मागणी केली आहे. तीन ऑडीयो क्लिप प्राप्त झाल्याचे फडणवीस यांनी म्हटले असून क्लिप देखील मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकारकडून प्राप्त होत असलेल्या निधीतून राष्ट्रीय आरोग्य मिशनची राज्याकडून अंमलबजावणी होत असताना, सेवेत कायम नियुक्त्या देण्याच्या नावाखाली सुमारे 400 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याबद्दल मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांना पत्र pic.twitter.com/HI1WfLUOdV
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 28, 2020
राष्ट्रीय आरोग्य मिशन कार्यक्रमात राज्यात २० हजार उमेदवार कार्यरत आहेत, त्यांना कायम करण्यासाठी एक ते अडीच लाख रुपये गोळा केल्या जात आहेत. एकूण बेरीज केली तर ३०० ते ४०० कोटी रुपयाचे कलेक्शन होत आहे. हे कोणाच्या आशीर्वादाने होत आहे, याची चौकशी करणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे. उमेदवारांकडून १ रुपयांचे सहमतीपत्र आणि ५०० रुपये लढा निधी असे संकलन करीत अर्जावर स्वाक्षरी घेतली जाते आणि सोबत १ ते २ लाख रुपयांदरम्यान रोख असलेला लिफाफा वेगळा देण्यास सांगितले जात असल्याची क्लिप असल्याचे फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे.
यासाठी खास बँक खाती उघडण्यात आल्याचे आरोप फडणवीस यांनी केले आहे.