राष्ट्रीय एमटीबी अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवड

0

नाशिक। पुणे येथे होणार्‍या 14 व्या राष्ट्रीय एमटीबी अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवड करण्यात आली. या निवड चाचणी स्पर्धेत पुरुषांच्या खुल्या गटात नाशिकच्या गोपीनाथ मुंडे आणि अरुण भोये तसेच युवक गटात निसर्ग भामरे यांची निवड झाली आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या खुल्या गटात नाशिकची अनुजा उगले तर सब ज्युनिअर गटात रीशिका लालवाणी यांची निवड झाली आहे.

ओरोबोरस या सायकल उत्पादक कंपनीच्या सहकार्याने प्रथमच नाशिकमध्ये झालेल्या या स्पर्धा अतिशय अटीतटीच्या झाल्या. त्यामुळे निवड समितीने निकाल दोन दिवसासाठी राखून ठेवला होता. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या सूचनेनुसार सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतून महाराष्ट्राच्या संघाची निवड करण्यात येणार होती. दुडगाव, महिरावणी, नाशिक येथे निवड चाचणी स्पर्धा पार पडल्या. नाशिक सायकलीस्ट फाउंडेशनने या स्पर्धांच्या आयोजनासाठी सक्रीय सहभाग घेत स्पर्धेसाठी लागणार्‍या सर्व सुविधांचा पुरवठा केला.

या स्पर्धेत 14, 16, 18 वर्षाखालील आणि खुला अशा मुला – मुलींच्या 8 गटाचा सहभाग होता. या निवड चाचणी स्पर्धेतून महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणारा 20 जणांचा संघ पुण्यात होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडण्यात आला आहे.

खुल्या पुरुष व महिला गटात प्रत्येकी 4 तर इतर गटात प्रत्येकी 2 अशा आठ गाटात एकूण 20 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. संजय साठे, मीनाक्षी ठाकूर आणि नितीन नागरे यांच्या त्रिसदस्यीय निवड समितीने खेळाडूंच्या कामगिरीचे मूल्यमापन करतसंघाची निवड केली.