राष्ट्रीय कराटे स्पर्धेत बुद्धभूषण गायकवाडची दोन पदकांची कमाई

0

देहूरोड : दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या ऑल इंडिया इंडिपेन्डन्स् कप स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्त्व करणार्‍या पिंपरी-चिंचवडच्या बुद्धभूषण गायकवाड याने 84 किलो वजनगटात ‘काता’ आणि ‘कुमिते’ प्रकारात अनुक्रमे कांस्य आणि रौप्य पदकाची कमाई केली. दोन पदके प्राप्त करणार्‍या गायकवाडचे शहरात जंगी स्वागत करण्यात आले. बुद्धभूषण गायकवाड याने स्पर्धेतील सुमारे चार हजार स्पर्धकांमध्ये आपले वेगळेपण सिद्ध करत दिल्लीत पिंपरी-चिंचवड शहराचा झेंडा फडकावला आहे.

देशभरातून आले स्पर्धक
पिंपरीतील महात्मा फुले महाविद्यालयात कला शाखेत द्वितीय वर्षात शिक्षण घेणार्‍या बुद्धभूषण गायकवाडने स्पर्धेत उत्तम कामगिरी करत दिल्लीत शहराची मान उंचावली. देशभरातून सुमारे चार हजार स्पर्धक या स्पर्धेसाठी आले होते. त्यात लष्कर, आयटीबीपी, आसाम रायफल्स्, सी. आर. पी. एफ., भारतीय खेल प्राधिकरण (मध्यप्रदेश) यासह देशातील विविध राज्यांतील स्पर्धकांचा समावेश होता. पिंपरी-चिंचवडमधून शितो रियू सेईको काई कराटे-दो पुणे या संस्थेकडून गायकवाड स्पर्धेत सहभागी झाला होता. कराटे असोसिएशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय कराटे महासंघाचे प्रशिक्षक व राष्ट्रीय पंच अविनाश चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील पाच-सहा वर्षांपासून गायकवाड सराव करीत आहे.

यांनी केले अभिनंदन
महात्मा फुले विद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, मराठी विभागप्रमुख डॉ. बाबासाहेब शेंडगे, डॉ. संजय मेस्त्री, डॉ. राजेंद्र बावळे तसेच क्रिडा विभागप्रमुख डॉ. पांडुरंग लहोटे यांनी बुद्धभूषण गायकवाड याचे अभिनंदन केले. यापुढेही चांगली कामगिरी करू, असा विश्‍वास बुद्धभूषण याने व्यक्त केला आहे.