राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत अंकीता गुंडला रौप्यपदक

0

आळंदी : अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून खेळत असलेल्या आळंदीतील अंकिता गुंडने लक्षवेधी लढत करून रौप्यपदक मिळविले. या स्पर्धा औरंगाबाद येथे होत आहेत. या विजयाने अंकिता गुंडचे आळंदी भागातून अभिनंदन केले जात आहे. अंकीताने या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत कर्नाटकमधील बंगलोर विद्यापीठच्या अर्चनाला 20 सेकंदात कलाजंग डावावर चितपट केले. उतकल विद्यापीठाच्या सोनिकाला लपेट डावावर दुसर्‍या फेरीत चितपट केले. त्यानंतर भावनगर विद्यापीठाच्या नागमणीला तिसर्‍या फेरीत चितपट करून उपांत्य फेरीत शिरकाव केला. उपांत्य फेरीत गुरुनानक विद्यापीठ पंजाबच्या राजबिर कौर ला 6 गुणांच्या फरकाने अंकिताने पराभूत केले. शेवटच्या फेरीत हरियाणाच्या मंजू बरोबर अटीतटीच्या लढतीत मात्र पराभवास सामोरे जावे लागले. या स्पर्धेत अंकिता गुंड ला रौप्यपदक मिळाले. या वर्षातील स्पर्धांतील अंकीताचे सलग दुसरे राष्ट्रीय पदक आहे. 23 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुद्धा अंकिताने पदक प्राप्त करीत यश मिळवले आहे. आळंदी येथील जोग महाराज कुस्ती केंद्राचे वैभवात या यशाने वाढ केली.