कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची माहिती
महाराष्ट्राने पटकावले ९ सुवर्ण पदक
मुंबई : ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा २०१८’ च्या विविध श्रेणींमध्ये महाराष्ट्राने उत्तम कामगिरी करत ९ सुवर्ण, ८ रजत आणि ६ कांस्य असे एकूण २३ पदक मिळवित अव्वल स्थान पटकाविले आहे. यातील सुवर्ण व रजत पदक विजेत्या स्पर्धकांची पुढील वर्षी रशिया येथे होणा-या आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेसाठीही निवड झाली असून ते भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.
केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाच्यावतीने येथील एरोसीटी भागात ३ ते ५ ऑक्टोबर २०१८ या कालावधित पार पडलेल्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेचा निकाल आज घोषित झाला. विज्ञान भवन येथे केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे आणि प्रसिध्द दिग्दर्शक माध्यम व मनोरंजन कौशल्य परिषदेचे अध्यक्ष तथा सुभाष घई यांच्या हस्ते आज या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
महाराष्ट्राला सर्वाधिक पुरस्कार
या स्पर्धेत सर्वाधिक २३ पदक मिळवून महाराष्ट्र देशात अव्वल ठरला आहे. ओडिशा २१ पदकांसह दुस-या तर प्रत्येकी १६ पदक मिळवून कर्नाटक व दिल्ली तिस-या स्थानावर राहिले आहेत. या तिन्ही राज्यांचे कौतुक देखील यावेळी श्री.निलंगेकर यांनी केले.
महाराष्ट्राची दमदार कामगिरी
देशभरातील २७ राज्यांतील ४०० पेक्षा अधिक स्पर्धक या कौशल्य स्पर्धेच्या महाकुंभात सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून २२ कौशल्य प्रकारात ४४ स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत महाराष्ट्राने ९ सुवर्ण, ८ रजत आणि ६ कांस्य असे एकूण २३ पदक पटकाविली आहेत. असे देखील श्री. निलंगेकर पुढे म्हणाले. व पुढील वर्षी रशिया येथे होणा-या आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेसाठीही निवड झाली असून ते भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघाला त्यांनी शुभेच्छा दिल्या.