राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीचा झेंडा

0

नवी दिल्ली : देशातील बहुप्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर यावर्षीही मराठी चित्रपटांनी आपली मोहोर उमटवली आहे. दिग्दर्शिक सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांच्या कासवने सुवर्णकमळ पटकावले असून, प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या ‘व्हेंटिलेटर’ला तीन, तर ‘दशक्रिया’ला मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवला.
सर्वोत्कृष्ट चित्रपट विभागात सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित ‘कासव’ने सुवर्णकमळ पटकावत पुरस्कारांची ही शर्यत जिंकली. ‘कासव’ हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. व्हेंटिलेटरने तीन पुरस्कारांवर आपले नाव कोेरले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय सत्कोत्कृष्ट संकलन व सर्वोत्कृष्ट व्हिडिओ रेकॉर्डिंग व साऊंड मिक्सिंगचा पुरस्कारही व्हेंटिलेटरने पटकावला आहे.

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान दशक्रिया या चित्रपटाने मिळवला असून, यातील भूमिकेसाठी मनोज जोसी यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच, सायकल या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट वेशभुषेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

अक्षय प्रथमच मानकरी
‘रुस्तम’ चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अक्षय कुमारला, तर ‘मिनामीनुनगु’ चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सुरभीला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. अक्षयचा हा पहिला राष्ट्रीय पुरस्कार आहे. ‘दंगल’च्या झायरा वसिमने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कारावर आपले नाव कोरले.

पुरस्कारार्थी असे :-
सर्वोत्कृष्ट चित्रपट : कासव (मराठी)
सर्वोत्कृष्ट इंदिरा गांधी पदार्पण पुरस्कार : अलिफा
सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावर भाष्य करणारा चित्रपट : पिंक
सर्वोत्कृष्ट बालचित्रपट : धनक
सर्वोत्कृष्ट गायक : सुंदरा अय्यर
सर्वोत्कृष्ट गायिका : इमान चक्रबर्ती
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : राजेश मापुस्कर
सर्वोत्कृष्ट अभिनेता : अक्षय कुमार
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : सुरभी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : झायरा वसीम
सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा : दशक्रिया
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : मनोज जोशी
सर्वोत्कृष्ट संकलन : व्हेंटिलेटर
सर्वोत्कृष्ट वेशभूषा : सायकल (मराठी)
सर्वोत्कृष्ट रि-रेकॉर्डिंग पुरस्कार : व्हेंटिलेटर
स्पेशल इफेक्ट : नवीन पॉल
सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा : नीरजा
सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिक्शन फिल्म : ‘अब्बा’
स्पेशल उल्लेखनीय पुरस्कार : नीरजा- सोनम कपूर