राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची 64 वर्षांची परंपरा का खंडित करता!

0

नवी दिल्ली – 64 वर्षांची परंपरा का खंडित केली जात आहे. बुधवारी पुरस्कार वितरणाची रंगित तालीम झाली. यावेळी आम्हाला समजले की राष्ट्रपती फक्त 10-11 जणांनाच पुरस्कार देणार आहेत. उर्वरित पुरस्कार हे स्मृती इराणींच्या हस्ते दिले जाणार आहेत. 64 वर्षांत कधीही असे झालेले नाही, मग यंदाच ही परंपरा का खंडित केली जात आहे? असा सवाल राष्ट्रीय पुरस्कार विजेते म्होरक्या चित्रपटाचे दिग्दर्शक अमर देवकर यांनी सवाल केला आहे.

कलाकारांच्या कलेचा सन्मान झाला पाहिजे यासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान केले जातात. मात्र राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जाणारा हा पुरस्कार केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते घेण्यास कलाकारांनी नकार दर्शविला आहे. सोहळ्याला काही तास शिल्लक असताना वितरण सोहळ्यावरुन वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांनी पुरस्कारावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे. स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणार नसल्याची भूमिका पुरस्कार विजेत्यांनी घेतली आहे. मराठी चित्रपट पुरस्कार विजेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कलाकारांनी राष्ट्रपती कार्यालय, डायरेक्टर ऑफ फिल्म फेस्टिव्हल आणि माहित आणि प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणे हा विजेत्यांचा सन्मान समजला जातो. यंदा मात्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे मोजके 10-11 पुरस्कारांचे वितरण करणार असल्याची माहिती आहे. उर्वरीत पुरस्कारांचे वितरण माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते केले जाणार आहे. स्मृती इराणींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यास विजेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले नाही तर सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा विजेत्यांनी घेतला आहे. त्यासंबंधीचे एक पत्रक काढण्यात आले असून त्यावर 60 जणांची स्वाक्षरी आहे.